Bhaskar Jadhav: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत देखील घातली होती. त्यानंतर साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला. साळवींच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला. अशातच आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी न मिळाल्याचे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पु्न्हा धनुष्यबाण हाती घेतला. मात्र आता कोकणातील ठाकरे गटाचे एकमेक आमदार भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भास्कर जाधव यांनी खंत बोलून दाखवली.
"महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं मला सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही," अशी कबुली भास्कर जाधव यांनी दिली.
"माझी राजकारणातील सुरुवात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मला भाषणं करायची संधी मिळाली. त्यावेळी शिबिरांत मला भाषणं करण्याची संधी मिळायची. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या पोराला महाराष्ट्रात फिरवा याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील, तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले,” असंही भास्कर जाधव म्हणाले.