राज्यात टेनिसचा थरार
By Admin | Updated: July 31, 2016 03:40 IST2016-07-31T03:40:05+5:302016-07-31T03:40:05+5:30
‘व्हीजन २०२०’ कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र ओपन इमर्जिंग स्टार्स टेनिस लीग’च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली

राज्यात टेनिसचा थरार
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या (एमएसएलटीए) वतीने ‘व्हीजन २०२०’ कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र ओपन इमर्जिंग स्टार्स टेनिस लीग’च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली असून, आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लीग रंगेल. त्याचबरोबर आशियाई टेनिस संघटनेच्या वतीने दोन पुरूष एशियन टेनिस टुर(एटीटी) स्पर्धेचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.
मुंबईत एमएसएलटीएतील सभागृहात सचिव सुंदर अय्यर यांनी लीग बाबतची माहिती देताना सांगितले की, १६ वर्षांवरील गटांतील खेळाडूंकरिता पहिल्या महाराष्ट्र ओपन इमर्जिंग स्टार्स टेनिस (एमईएसटी) लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. कुमार, पुरूष आणि महिला गटांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. खेळाडूंची लिलाव पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. प्रत्येकी चार संघ अशी दोन गटांत एकूण आठ संघ विजेतेपदासाठी खेळतील. फ्रँचाईजीमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, सोलापुर, मराठवाडा, नागपुर, ठाणे या संघांचा समावेश आहे. एका संघात जास्तीत जास्त १० खेळाडू असतील. १६ वर्षांखालील ३ खेळाडू, १८ वर्षांखालील ५ खेळाडू, पुरूष व महिला गटांतील दोन खेळाडू असणार आहेत. प्रत्येक संघ ५ सामने खेळणार आहे.
मुंबई ज्युनियर लीग स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून १०, १२, १४ वर्षांखालील वयोगटांतील सुमारे ९० खेळाडूंचा समावेश आहे. सामने आॅल-प्ले-आॅल फॉरमेटमध्ये दोन महिने खेळविण्यात येणार असून अव्वल चार संघांना रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.
मुंबईतील चर्चगेट - कुलाबा येथील एमएसएलटीए व खार जिमखाना येथे आशियाई टेनिस संघटनेच्या वतीने दोन पुरूष एशियन टेनिस टुर(एटीटी) खेळवण्यात येणार आहे. तसेच ३५ वर्षांवरील वयोगटांतील खेळाडूंकरिता आंतर क्लब टेनिस स्पर्धा खेळवण्यात येणार असून स्पर्धेतील खेळाडूंना एक लाख रुपयांचे विमा सुरक्षा देण्यात येईल. (क्रीडा प्रतिनिधी)