‘तात्पुरते’ बसले अडून!
By Admin | Updated: May 6, 2015 04:30 IST2015-05-06T04:30:13+5:302015-05-06T04:30:13+5:30
मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.

‘तात्पुरते’ बसले अडून!
यदु जोशी, मुंबई
राज्यातील मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात गेलेले अधिकारी-कर्मचारी तिथे चांगलाच ठिय्या मांडून बसले आहेत. मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी हे १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध विभागांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात पाठविले. पीए, पीएस, ओएसडी, लिपिक, टंकलेखक, शिपाई आदी पदांवर गेलेले हे कर्मचारी तिथे असे काही रमले, की मूळ विभागात परतण्याचे नाव ते घेत नाहीत. अल्पाधितच त्यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे अशा वजनदार मंत्र्यांशी सूत जमविल्यामुळे विभाग प्रमुखांनी ‘परती’चा आदेश काढला तरी त्यांनी त्यास जुमानले नाही. मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्तींना कर्मचारी/ अधिकारी म्हणून सामावून घेण्यात आले आहे. त्यांना सहसचिव, उपसचिव आदी पदांचा दर्जाही देण्यात आला आहे. या सर्वांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ लागू करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊनच सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे सर्व नियम त्यांना लागू झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागातून पाच कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या मंत्री आस्थापनेवर पाठविण्यात आले होते. मात्र ते कर्मचारी मूळ विभागात परत येईनात. म्हणून विभागाने आदेश काढून त्यांना मूळ विभागात तीन दिवसांत रुजू व्हा नाहीतर वेतन रोखू, असा दम दिल्यावर ते विभागात परतले.
... तपासणीनंतर निर्णय
प्रत्येक मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी/अधिकारी असतील याचा एक आकृतीबंध असतो. त्यानुसार पदे भरण्यात आल्यानंतर कर्मचारी अतिरिक्त ठरतात का ते तपासले जाईल. तात्पुरत्या स्वरुपात पाठविलेले कर्मचारी अतिरिक्त असतील तर त्यांना त्यांच्या विभागामध्ये परत जावे लागेल. - स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव.
या नियमातील काही तरतुदी
च्कर्मचाऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देणग्या घेता येणार नाहीत.
च्सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्यांचे सेवन करता येणार नाही.
च्संपत्तीचे विवरण नियमितपणे सरकारकडे सादर करावे लागेल.
च्शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.
च्धार्मिक तेढ पसरविणाऱ्या संघटनेचे सदस्य होता
येणार नाही.
च्कोणताही कर्मचारी दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्र वा नियतकालिकाकडे लेख व पत्र पाठवू शकणार नाही.