तंत्रज्ञान हे गरीबी संपविण्याचे औषध - विजयकुमार सारस्वत
By Admin | Updated: June 30, 2016 16:32 IST2016-06-30T16:32:46+5:302016-06-30T16:32:46+5:30
जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील

तंत्रज्ञान हे गरीबी संपविण्याचे औषध - विजयकुमार सारस्वत
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३० - जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील तरुण यांनी यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गरिबी दूर होऊ शकेल., असे मत केंद्रीय नीति आयोगाचे सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते गुरुवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने मोठी झेप घेतली आहे. परंतु आजदेखील समाजात विविध विषमता दिसून येतात. समाजातील विषमता नष्ट करायची असेल तर त्यावर विकास हाच एक पर्याय आहे व विकासासाठी तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. पेटंट नोंदणीची संख्यादेखील वाढली पाहिजे, असे डॉ.सारस्वत म्हणाले.
शासनाच्या आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर हवा...
प्रशासकीय स्तरावर याचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. शासन तसेच प्रशासनातील महसूल, कर इत्यादी आर्थिक व्यवहार हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत. संशोधनाला शासनातर्फे पूर्ण सहकार्य लाभले पाहिजे. स्टार्टअप्सला सुरुवातीच्या काळात मदत केली पाहिजे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथे व्हॅल्यू क्रिएशन सेंटर उभारले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.सारस्वत यांनी केले.