यड्राव : मोठमोठ्या उद्योगांमध्ये तसेच महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असणारे कपॅसिटर नादुरुस्त झाल्यास त्याचा संदेश संबंधितांना मिळणार आहे. यामुळे नादुरुस्त कपॅसिटर शोधणे व त्यासाठी उद्योगांना विद्युत पुरवठा खंडित ठेवावा लागणार नाही, असे तंत्र येथील शरद इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या तंत्रामुळे विद्युत पुरवठा अखंडित राहून मनुष्यबळाचा उद्योगास उपयोग होणार आहे, तर उद्योगांना विद्युत पुरवठा खंडित होणार नसल्याने आर्थिक नुकसान टळणार आहे.महावितरणकडून ग्राहकास विद्युत पुरवठा करताना तसेच मोठमोठ्या उद्योगांमध्ये विद्युत पुरवठा वितरण क्षमता वाढविण्याकरिता कपॅसिटर बॅक बसविण्यात येतात. विद्युत पुरवठा होताना तो योग्य प्रमाणात होण्यासाठी एकापेक्षा जादा कपॅसिटर बसविण्यात येतात. त्यामधील कोणत्याही कपॅसिटरमध्ये दोष निर्माण झाला, तर वितरण व्यवस्थेत विस्कळीतपणा येतो. त्यातील नेमका कोणता कपॅसिटर बिघडला हे समजणे अवघड होते. याकरिता संपूर्ण वितरण व्यवस्था बंद करावी लागते. कपॅसिटर काढून तपासणीकरिता न्यावे लागतात. त्याकरिता बराच वेळ लागतो. शरद इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल विभागातील रणजित पाटील, स्वप्निल भाट, चेतन कदम, सोनल माळी या विद्यार्थ्यांनी या विद्युत वितरण व्यवस्थेचा व त्यातील गुण-दोषांचा अभ्यास केला. प्रा. मंगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रिअल टाईम मॉनिटरिंग स्कीम फॉर हाय व्होल्टेज कपॅसिटर बॅक’ हे युनिट तयार करून नवे तंत्र विकसित केले आहे.उद्योगाना नवे तंत्र उपयुक्तसध्याच्या स्पर्धेच्या युगात उद्योगाला अखंड विद्युत पुरवठा सुरू राहणे उद्यमशीलतेसाठी फायद्याचे आहे. शरदच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास उद्योगातील आर्थिक नुकसान कमी करता येईल, असे सांगलीच्या शारदा इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे संचालक अभिजित शेटे यांनी सांगितले.
‘शरद’च्या विद्यार्थ्यांनी विकसित केले तंत्र
By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST