शिक्षकास ग्रा.पं. सदस्याकडून मारहाण
By Admin | Updated: September 20, 2016 03:28 IST2016-09-20T03:28:29+5:302016-09-20T03:28:29+5:30
कुसुंबळे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद केशव ठाकूर यांनी गेल्या २ सप्टेंबर रोजी शाळा सुरु असताना मद्यधुंद अवस्थेत मारहाण केली.

शिक्षकास ग्रा.पं. सदस्याकडून मारहाण
अलिबाग : तालुक्यातील कुसुंबळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता ती शाळा स्वखर्चाने डिजिटल करणारे उपशिक्षक चंद्रशेखर महादेव म्हात्रे यांना आदिवासी मुलांची ही शाळा डिजिटल केली म्हणून, कुसुंबळे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद केशव ठाकूर यांनी गेल्या २ सप्टेंबर रोजी शाळा सुरु असताना मद्यधुंद अवस्थेत मारहाण केली. या प्रकरणी पोयनाड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाण प्रकरणी उपशिक्षक चंद्रशेखर महादेव म्हात्रे यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली असता, या प्रकरणी ‘अदखलपात्र गुन्हा’ या सदरात पोलिसांनी नोंद करुन, केवळ सोपस्कार पूर्ण करुन उपशिक्षक चंद्रशेखर महादेव म्हात्रे यांची बोळवण केली असल्याने शिक्षकवृंदात विशेषत: अपंग शिक्षकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबळे आदिवासी केंद्र, काचळी, ता. अलिबाग, जि. रायगड येथे चंद्रशेखर महादेव म्हात्रे हे अपंग शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सर्व शाळांमध्ये लोकवर्गणीतून डिजिटल शाळा करण्याचे काम सध्या चालू आहे. म्हात्रे ज्या शाळेत काम करतात त्या शाळेत येणारे विद्यार्थी हे आदिवासी जमातीचे असून, ते मुळातच अत्यंत हलाखीत जीवन व्यतित करत आहेत. परिणामी या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा डिजिटल करण्याकरिता पालक वर्गणी मिळू शकत नाही. ज्यांच्याकडे मुलांना दोन वेळेच जेवण देण्याची भ्रांत आहे अशा पालकांकडून वर्गणी मागणे मला उचित वाटले नाही, म्हणून मी स्वखर्चाने शाळा डिजिटल करण्याचे ठरविले व त्यानुसार मी डिजिटल सेट खरेदी केला व शाळेत लावला, असे म्हात्रे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, अलिबाग पं.स.चे गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी आणि रायगड जिल्हा शिक्षक संघटनेला दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.
शाळा डिजिटल करण्याकरिता हा खर्च कोणत्याही संस्थेकडून अथवा शासनाकडून मागितलेला नाही. शाळा डिजिटल करीत असताना स्थानिक प्रशासन म्हणजे कुसुंबळे ग्रामपंचायतीकडून सहाय्य अपेक्षित होते. परंतु तसे न करता ग्रामपंचायत सदस्य प्रमोद केशव ठाकूर हे वेळोवेळी मला विरोध करीत होते व ‘तू शाळा डिजिटल कशी करतोस ते मी बघतोच’ अशी धमकी मला देत होते. परंतु मी तरीही केवळ विद्यार्थी हिताकरिता डिजिटल सेट शाळेत लावल्याचा राग त्यांच्या मनात होता,असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
गेल्या २ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता शाळा सुरु असताना व मी मुलांना शिकवत असताना ग्रामपंचायत सदस्य प्रमोद केशव ठाकूर हे दारू प्यायलेल्या अवस्थेत शाळेत आले व मला शिवीगाळ करू लागले. मी त्यांना ‘तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहात तसेच मी सध्या कामात आहे’ असे सांगत असतानाच ते माझ््या अंगावर धावून आले व माझ््या थोबाडीत मारली, अशी घटना म्हात्रे यांनी नमूद केली आहे.
(विशेष प्रतिनिधी)
पोलिसांनी कारवाई न केल्याने नाराजी
घटनेची माहिती मी पोयनाड पोलीस स्टेशनला मोबाइलवरून १२ वाजून १० मिनिटांनी देऊन, मला संरक्षण मिळण्याची विनंती केली होती. पोयनाड पोलीस स्टेशनकडून संरक्षण मिळाले नाही. परिणामी मी अलिबागला रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो असता त्यांच्या समाधान कक्षातून मला पुन्हा पोयनाड पोलीस स्टेशन येथे पाठवले. त्यावेळी पोयनाड पोलिसांनी साध्या स्वरूपातला गुन्हा नोंदवून घेतला. त्यावर त्यांनी काही कार्यवाही केली नाही. तरी या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा म्हात्रे यांनी आपल्या या तक्रार निवेदनात अखेरीस नमूद केली आहे.
कारवाई करणार - तांबे
अपंग शिक्षक चंद्रशेखर म्हात्रे यांना मारहाण झाल्या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीनुसार अदखल पात्र गुन्हा दाखल करुन, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ठाकूर यांना पोयनाड पोलिसांनी समज दिली आहे. उभयतांना व त्यावेळी उपस्थित काही साक्षीदार यांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेवून या प्रकरणात रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पेण उप विभागीय पोलीस अधिकारी जयसिंग तांबे यांनी दिली आहे.