नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकाला मंजुरी दिल्याच्या आरोपावरून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्य. शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम यांच्यासह अन्य तीनजणांना अटक केल्यानंतर, सदर पोलिसांनी मंगळवारी विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यात मुख्याध्यापक पराग पुडकेने पाठविलेला प्रस्ताव पोलिसांच्या हाती लागला आहे.
पोलिस पोहोचताच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी नरड यांच्या कक्षाची तपासणी केली व कागदपत्रे तपासली.
सायबर पोलिसांकडून तपास
शालार्थ आयडीसंदर्भात सायबर पोलिसांकडूनही चौकशी सुरू आहे. या दोन्ही प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यापासून लिपिकांपर्यंतची चौकशी केली जात आहे.
१,०५६ शिक्षकांची यादी शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरत असून, अनेक शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे लक्ष असून, पुढेही काही अधिकाऱ्यांना अटक होण्याचे संकेत मिळत आहेत.
आणखी एक दिवसाची कोठडी
पोलिसांनी मंगळवारी उल्हास नरड, नीलेश मेश्राम, पराग पुडके, उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडी वाढवल्याचे सदर ठाण्याचे वरिष्ठ पो. निरीक्षक मनिष ठाकरे यांनी सांगितले.
प्रस्ताव नेमका कोणता?
मुख्याध्यापक पुडके याने मुख्याध्यापकाच्या नियुक्तीसंदर्भात एक प्रस्ताव शिक्षणाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविला. नंतर तो शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक नरड यांच्याकडे पाठविला, तो पोलिसांना मिळाला.