घरगुती वीज ग्राहकांना टाटाचा दिलासा !
By Admin | Updated: February 26, 2015 03:07 IST2015-02-26T03:07:16+5:302015-02-26T03:07:16+5:30
रिलायन्स आणि महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करीत ग्राहकांना शॉक दिला असतानाच टाटा पॉवरने मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे.

घरगुती वीज ग्राहकांना टाटाचा दिलासा !
मुंबई : रिलायन्स आणि महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करीत ग्राहकांना शॉक दिला असतानाच टाटा पॉवरने मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. टाटा पॉवरने आयोगाकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट २ रुपये ६२ पैसे व १०० ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ४ रुपये ५६ पैसे दरवाढ मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात गतवर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरच्या घरगुती ग्राहकांना ही प्रस्तावित दरवाढ नगण्य आहे.
महावितरणने औद्योगिक ग्राहकांवरील वीजदराचा भार कमी करण्यास राज्य वीज नियामक आयोगाकडे ८ टक्के दरवाढीचा ४,७१७ कोटींचा प्रस्ताव सादर केला. रिलायन्सनेही १८ ते २० टक्के दरवाढीकरिता १,८०० कोटींचा प्रस्ताव दिला. मुंबई उपनगरांत टाटा व रिलायन्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यास जोरदार स्पर्धा सुरू आहे. टाटाचे ३०० युनिटपर्यंतचे दर रिलायन्सच्या तुलनेत कमी आहेत. औद्योगिक दरांचा विचार करीत टाटाच्या तुलनेत रिलायन्सच दर कमी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या केंद्रस्थानी घरगुती ग्राहक असले तरी रिलायन्सपेक्षा टाटाचे दर कमी असल्याने ३०० युनिटपर्यंतचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे आकर्षित होत आहेत. नव्या प्रस्तावावर आता आयोगाने टाटा पॉवर कंपनीला यासंदर्भात १७ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती मागविण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.