चाकरमान्यांसाठी वार्ता विघ्नाची!

By Admin | Updated: August 25, 2014 04:09 IST2014-08-25T04:09:01+5:302014-08-25T04:09:01+5:30

कोकण रेल्वेमार्गावरील वीर आणि करंजाडी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीचे ८ डबे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली

Talking for the chatters! | चाकरमान्यांसाठी वार्ता विघ्नाची!

चाकरमान्यांसाठी वार्ता विघ्नाची!

खेड/महाड : कोकण रेल्वेमार्गावरील वीर आणि करंजाडी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीचे ८ डबे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, लांब पल्ल्याच्या सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवासाठी कुटुंबकबिल्यासह निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
गाड्या खोळंबल्याने अनेक स्थानकांवर प्रवासी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत कोकण रेल्वेमार्गावरील गाडी घसरण्याची ही चौथी घटना आहे. दरम्यान, घसरलेले डबे बाजूला काढण्याचे तसेच रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती करंजाडी स्टेशन मास्तर राजकुमार आंबास्ता यांनी दिली. या मालगाडीतून गव्हाची वाहतूक करण्यात येत होती. मालगाडीच्या घसरलेले आठ डबे सोडून ही मालगाडी सकाळी ८.३० वाजता रत्नागिरीकडे रवाना करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आधीच हैराण झालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासामध्ये या घटनेमुळे विघ्न निर्माण झाले आहे. मालगाडी वीर ते करंजाडी स्टेशनांदरम्यान घरसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या महाड व खेड आगारातून सुमारे ५०हून अधिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महाड आगारातून यासाठी २५ बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महाडचे वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Talking for the chatters!