"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:19 IST2025-07-15T08:18:48+5:302025-07-15T08:19:25+5:30
मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे असं सांगत शिंदेंनी वादग्रस्त नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.

"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
मुंबई - मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेच्या नेत्यांमुळे पक्ष अडचणीत आल्याचे चित्र दिसून आले. आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला केलेली मारहाण, मंत्री संजय संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओ यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोलले जाते. बातम्यांमध्ये सातत्याने शिंदेसेनेच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि कृत्य झळकत असल्याने पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नेते, पदाधिकारी यांना कानपिचक्या दिल्या.
सोमवारी दादर येथे एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की, मागील काळात ज्या घटना घडल्या त्यामुळे लोक तुमच्यावर नाही तर माझ्यावर प्रश्न उभे करतात. मला विचारले जाते, तुमचे आमदार काय करतायेत? काही मंत्र्यांना बदनामीमुळे घरी जावे लागले. मला तुमच्यावर कारवाई करायला आवडत नाही परंतु जर कुणी तशी वेळ आणली तर मी करेन असा इशारा त्यांनी वादग्रस्त नेत्यांना दिला.
तसेच कमी बोला, जास्त काम करा. चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्ची घालू नका. आपण एकाच कुटुंबातील आहोत. तुमची बदनामी ती माझी बदनामी आहे. मी प्रमुखासारखं वागत नाही, मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे. आपल्याला खूप कमी कालावधीत मोठे यश मिळाले आहे. काही जण आपली प्रतिमा मलिन करण्याचा कट रचत आहेत. येणाऱ्या काळात आपली परीक्षा असेल. सामाजिक जीवनात वावरताना काळजी असंही एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना सांगितले.
एकनाथ शिंदे नाराज का?
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदेसेनेच्या २ नेत्यांनी केलेल्या वर्तवणुकीमुळे सरकार अडचणीत आले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणासाठी जबाबदार धरत आमदार निवासस्थानातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्याशिवाय सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत एका पलंगावर बसून शिरसाट सिगारेट ओढत होते आणि शेजारी पैशांनी भरलेली बॅग होती असा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिरसाट अडचणीत सापडले. या सर्व प्रकारावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे पुढे आले.