यवतमाळचे विमानतळ रिलायन्सकडून परत घ्या
By Admin | Updated: October 6, 2015 02:34 IST2015-10-06T02:34:01+5:302015-10-06T02:34:01+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यवतमाळ येथील विमानतळ रिलायन्स कंपनीकडून परत घेण्याची कार्यवाही करावी व स्थानिक लोकप्रतिनीधींची बैठक घेऊन तोडगा काढावा

यवतमाळचे विमानतळ रिलायन्सकडून परत घ्या
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यवतमाळ येथील विमानतळ रिलायन्स कंपनीकडून परत घेण्याची कार्यवाही करावी व स्थानिक लोकप्रतिनीधींची बैठक घेऊन तोडगा काढावा, असे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर येथील विमानतळ आधुनिकीकरणाबाबत मुनगंटीवार यांनी सोमवारी बैठक घेतली. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार मदन येरावार, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अकोला येथील विमानतळाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीन ताब्यात घ्यावी व ३४ हेक्टर खासगी जमीन तडजोडीद्वारे संपादित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर येथील विमानतळाच्या आधुनिकीकरणाकरिता पोचरस्ते, दुतर्फा वृक्ष लागवड, संरक्षक भिंतीचे बांधकाम, टर्मिनल इमारतीची दुरुस्ती व सुरक्षा दालनाचे बांधकाम आदीबाबत त्वरित फेरअंदाजपत्रक सादर करून १ नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर अमरावती विमानतळ परिसरातील उच्चदाब वीजवाहिनी आणि तेथून जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गाबाबत केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)