Take the exam offline, but not right now! | परीक्षा ऑफलाइन घ्या, पण सध्या नको; दहावी, बारावीसाठी मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

परीक्षा ऑफलाइन घ्या, पण सध्या नको; दहावी, बारावीसाठी मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

मुंबई : आजच्या परिस्थितीत सरकार घेत असलेले निर्णय व झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांबाबत घाईने शेवटच्या टप्प्यात निर्णय न घेता त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली.

मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून मुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने विचार करावा, यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही अंतर्भाव असावा असे मत संघाने मांडले. मराठी शाळा संस्थाचालकांची ही भूमिका आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपात मांडल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी दिली.

परीक्षेच्या कार्याचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर विभागावर किंवा जिल्हानिहाय जिथे परीक्षा घेण्यायोग्य परिस्थिती आहे अशा ठिकाणी परीक्षा घेण्यासोबत पेपर तपासणीसुद्धा स्थानिक पातळीवर करता येईल का, असा विचार शिक्षण विभागाने करायला हवा. तसेच परीक्षेचे नियोजन करण्याआधी कोणत्याही वयोगटाचा विचार न करता सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सरसकट लसीकरण करून विद्यार्थ्यांच्याही लसीकरणासाठी विचार व्हावा असे मत शाळा संस्थाचालकांनी मांडले.

७ एप्रिल रोजी मराठी शाळा संस्थाचालक संघाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यात राज्याच्या सहा ते सात जिल्ह्यांतील २५ ते ३० मराठी शाळा संस्थाचालकांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षा ऑफलाइन व्हाव्यात, पण सध्या नकाे, असे मत मांडण्यात आले.­

सुरक्षा महत्त्वाची!
ग्रामीण परिस्थिती, कनेक्टिव्हिटी, गुणवत्तेचा विचार करता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच व्हावी; मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात घालून, मानसिक ताण देऊन नकाे, असे संस्थाचालकांचे मत असल्याचे शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Take the exam offline, but not right now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.