मुंबई : राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. तर पुणे मनपा क्षेत्रातील पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या राज्यभरात १६७ रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे मनपा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान १० लाख ५८ हजार ३४१ रुग्णांना तपासण्यात आले आहे. तर १८ हजार ७८८ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीरच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, या काळात १ हजार २०७ रुग्णांना रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. २०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ रुग्णांचा बळी गेला होता, तर २ हजार ५९३ रुग्ण आढळून आले होते, तर २०१७ मध्ये ७७८ मृत्यूंची नोंद झाली होती आणि ६ हजार १४४ बाधित रुग्णांची संख्या दिसून आली होती.आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:15 IST