धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:08 IST2025-04-22T13:07:46+5:302025-04-22T13:08:44+5:30
Beed News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी केलेल्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी केलेल्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट (४६) यांचा सोमवारी पुण्यातील एका रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला होता. मात्र मनाली घनवट यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, खूप खूप धक्कादायक! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे, पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी या ट्विटमधून केला.
खूप खूप धक्कादायक !
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 21, 2025
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.
पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते.
राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने… pic.twitter.com/m7LmqE35wD
दरम्यान, अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वीच याच राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप केले होते. मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला. माझ्या घरी आले तेव्हा राजेंद्र घनवट या व्यक्तीने शेतकऱ्यांचा छळ केल्याचं समोर आले. धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे राजेंद्र घनवट आहेत. या लोकांनी ११ शेतकऱ्यांना छळून त्यांच्या जमिनी लाटल्या. कोट्यवधीच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. मृत शेतकऱ्यांना जिवंत दाखवून जमिनी लाटल्या. जे शेतकरी विरोधात गेले त्यांच्याविरोधात खूनाचे, मानहाणीचे गुन्हे दाखल केले. त्यात एक पीएसआयदेखील आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि घनवट यांचा काय संबंध आहे, त्यांचे आर्थिक संबंध कसे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. २००४ पासून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. बनावट कागदपत्रे बनवण्यात आली आहे. याविरोधात यंत्रणा बोलत नाही. राजकारण्यांच्या पाठबळाने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. बीडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्यात त्याची चौकशी करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.