नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
By Admin | Updated: February 15, 2016 04:03 IST2016-02-15T04:03:29+5:302016-02-15T04:03:29+5:30
डीव्हीसी तसेच दोन सेक्शन कमांडरसह एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या नऊ जहाल नक्षल्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली : डीव्हीसी तसेच दोन सेक्शन कमांडरसह एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या नऊ जहाल नक्षल्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.
शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला नक्षल्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, २०१५मध्ये ५६, तर २०१६च्या दीड महिन्यात १२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेला व नक्षल्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसी) सुनील ऊर्फ रामजी सुनसी मट्टामी, कंपनी क्रमांक ४ चा सेक्शन कमांडर शिवा ऊर्फ सत्तू ऊर्फ भिमा राजू नरोटे व त्याची पत्नी राखी ऊर्फ रेखा तिम्मा (प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस), कंपनी क्र.१० ची सदस्य मीरा देवू नरोटे, टिप्पागड दलम सदस्य कमला ऊर्फ रम्मी बाजीराव हिडको, गट्टा दलम सदस्य सोमजी ऊर्फ लेबू मोडी आतलामी, कसनसूर दलम सदस्य लक्ष्मण ऊर्फ लालू सोमा नरोटे, गट्टा दलम सदस्य दोडगे दुगे आत्राम, मंगू ऊर्फ रामजह आंदरु मट्टामी यांचा समावेश आहे. परिसरातील १७ चकमकी, १४ जाळपोळी व ९ हत्या प्रकरणात सुनीलचा सहभाग होता. शिवा नरोटे ११ गुन्ह्यांत सहभागी होता. राखी तिम्मा हिने ९ गुन्हे केले आहेत, तर मीरा नरोटे ही दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. टिप्पागड दलम सदस्य असलेली कमला हिडको ही उत्तर गडचिरोलीतील नक्षल्यांच्या जनताना सरकारचा प्रमुख सावजी याची पत्नी आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कमलाने चोवीस तासांच्या आतच आत्मसमर्पण केल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)