मुंबई - आशिया खंडातील पहिली महिला लोको पायलट म्हणून मान मिळवलेल्या सुरेखा यादव सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. गुरुवारी त्यांनी राजधानी एक्स्प्रेस चालवत दिल्ली ते मुंबई अशी महिला लोको पायलट म्हणून शेवटची सफर केली.
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे उतरल्यानंतर फलाटावर त्यांचे सहकारी, कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी मध्य रेल्वेच्या अनेक मालवाहू ट्रेन, मुंबई लोकल, नियमित एक्स्प्रेस ते राजधानी आणि अगदी वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनही चालविल्या आहेत. सुरेखा यादव यांनी गुरुवारी हजरत निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्स्प्रेस ही शेवटची ट्रेन चालवली.
सहकारी ट्रेनचालक, लोको पायलट, विभागातील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी सीएसएमटीवर येताच हार आणि फुलांनी दणक्यात त्यांचे स्वागत केले. त्यांनी रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण होत १९८९ साली त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये प्रवेश केला. सुरेखा यादव यांनी गुड्स ट्रेनमध्ये सहायक चालक त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.
विश्रांतीसाठी मुंबईबाहेरसुरेखा यादव विश्रांतीसाठी मुंबईबाहेर जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पुढच्या आठवड्यात आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास त्या परत येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गेली ३६ वर्षे मी लोकोमोटिव्हमधून प्रवास केला. ही कदाचित माझी अखेरची खेप असेल, असे यादव म्हणाल्या.
मालगाडी ते वंदे भारतमालगाडीसाठी सहायक चालक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करत जुनी इंजिने ते अत्याधुनिक वंदे भारत ट्रेन असा प्रेरणादायी प्रवास सुरेखा यादव यांनी केला. महिलादेखील लोको पायलट बनू शकतात, असा विश्वास यादव यांनी लोको पायलट बनू इच्छिणाऱ्या महिलांना दिला.