Congress Supriya Shrinate News:काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची भरपूर कामे केली आहेत. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायद्या सारखी अत्यंत महत्वाची कामे केली पण मागील ११ वर्षात भाजपा सरकारने केलेले एकही काम उल्लेखनीय नाही. जनकल्याणाची कामे करूनही काँग्रेस पक्ष प्रचार व प्रसार करण्यात कमी पडला. आता जागे व्हा व जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय व्हा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले.
निवडणूक आयोग आणि भाजपाने संगनमताने मतचोरी करून निवडणुकीत विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश राहुलजी गांधी यांनी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या मतचोरीविरोधात "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पुण्याच्या खडकवासला येथील शिबिर स्थळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्ष-या करून या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ‘सोशल मीडिया’ या विषयावर सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले.
सोशल मीडिया सर्वांत प्रभावी अस्त्र
सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पाच महिन्यात मतदारांची संख्या कशी वाढली याची माहिती दिली तसेच मतचोरी कशी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी केलेली पोलखोल दाखवली.
दरम्यान, २००४ ते २००२४ च्या दरम्यान झालेल्या सर्व निवडणुकातील मतदारसंख्या व झालेले मतदान यांची आकडेवारीसह माहिती दिली. मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांवर भाजपाने कब्जा करून ठेवला आहे आणि काँग्रेसला प्रसिद्धी खूप कमी दिली जाते अशा परिस्थितीत सोशल मीडिया हेच महत्वाचे साधन ठरत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सोशल मीडिया संदर्भात काही प्रश्न विचारले, त्याची सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तरेही दिली.