धर्माच्या राजकारणाला पाठबळ
By Admin | Updated: January 21, 2017 01:09 IST2017-01-21T01:09:16+5:302017-01-21T01:09:16+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे.

धर्माच्या राजकारणाला पाठबळ
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे. संघाचा इतिहास आणि संघाद्वारे प्रकाशित साहित्याचा अभ्यास केल्यास, त्यांच्यापुढे मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट अशी तीन आव्हाने आहेत. संघाच्या लोकांनी देशात धर्माच्या राजकारणाला पाठबळ दिले. स्वामी विवेकानंददेखील आपले असल्याचा त्यांचा कांगावा अनेक वर्षांपासून सुरू आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार अतमजितसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
जनसहयोग फाउंडेशन आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित विचारवेध संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘भारताचा राष्ट्रवाद - संकल्पना, स्वरूप, आव्हाने’ हा विषय घेऊन हे तीन दिवसीय संमेलन होत आहे. या वेळी प्रा. विजय नाईक, प्रमोद निरगुडकर, संमेलनाचे आयोजक आनंद करंदीकर आदी उपस्थित होते.
देशाच्या इतिहासाचा मागोवा घेत अतमजितसिंग यांनी ‘देशभक्ती’च्या व्याख्येवर परखड भाषेत टीका केली. ते म्हणाले, ‘‘देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची बिजे रुजवायची असतील, तर नागरिकांमध्ये एकमेकांप्रति मानवतेची आणि प्रेमाची भूमिका निर्माण होण्याची आवश्यकता आहे. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण होण्यासाठी महान इतिहासाची आणि त्या प्रकारचे वातावरण तयार होण्याची गरज असते. कोणी एखादा येईल आणि म्हणेल देशभक्त व्हा, असे शक्य होऊ शकत नाही.
‘‘देशभक्तीचे डोस देऊन ती भावना निर्माण होत नसते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत देशभक्तीची व्याख्याच बदलली आहे. संघाला विशिष्ट प्रकारची देशभक्ती अभिप्रेत आहे.’’
निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. नाईक यांनी मनोगत व्यक्त करून विचारवेध संमेलनाचे उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती यांची माहिती दिली.