उपराजधानी चिंब !

By Admin | Updated: July 16, 2014 01:22 IST2014-07-16T01:22:14+5:302014-07-16T01:22:14+5:30

पहिल्याच जोरदार पावसाने उपराजधानीत दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले.

Supper chimb! | उपराजधानी चिंब !

उपराजधानी चिंब !

नाल्या, गटारी तुंबल्या : महापालिकेचा उडाला फज्जा
नागपूर : पहिल्याच जोरदार पावसाने उपराजधानीत दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले. बहुसंख्य सर्वच चौकातील रस्ते पाण्याखाली गेले. नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. मंगळवारच्या पावसाने नागपूरकर सुखावले असले तरी महापालिकेचा पावसापूर्वीचे नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. लोकमत चमूने ‘आॅन दि स्पॉट’ जाऊन वस्त्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्षानुवर्षांपासूनच्या समस्या आजही कायम असल्याचे पहायला मिळाले. शासकीय मदतीची वाट पाहून हताश झालेल्या नागरिकांची या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड पहायला मिळाली.
पार्वतीनगर
रामेश्वरी बसथांब्याच्या मागील पार्वतीनगरातील ओळ क्र. २ मधील प्लॉट नं. ३७ येथील मुश्ताक शेख यांच्यासह आजूबाजूंच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या भागात नुकतीच ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. परंतु निकृष्ट दर्जा आणि चुकीच्या पद्धतीने ही लाईन टाकल्याने जागोजागी फुटली. या संदर्भात महापालिकेडे तक्रार करण्यात आली, मात्र कोणीच याची दखल घेतली नाही. डे्रनेज लाईन तुंबल्याने आणि अनेक लोकांनी पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर अतिक्रमण केल्याने घरात पाणी शिरल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
गोपालनगर
गोपालनगर येथील जुगलकिशोर ले-आऊट परिसरात रस्त्यांच्या कडेला टाकून ठेवलेल्या रेती आणि गिट्टीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे रेती व गिट्टी रस्त्यांवर वाहून आली. शिवाय यामुळे पाण्याचा निचरा होण्यासदेखील अडथळे येत होते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ही समस्या आहे. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे रस्ते ‘ब्लॉक’ झाले होते. सोबतच परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने पाण्यामुळे कचरा रस्त्यांवर जमा झाला होता. यावरून गाडी घसरल्याने दोन दुचाकीस्वारदेखील जखमी झाले. ड्रेनेज लाईनदेखील ‘चोक’ झाल्या असून प्रशासन व नगरसेवकांकडून पावसाचा सामना करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
इतवारी
इतवारी येथील गरुडखांब परिसरात बांधकामाचे साहित्य आणि कचरा रस्त्यांवरच टाकल्यामुळे पावसाचे पाणी जमा झाले होते. पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्यामुळे नागरिकांच्या घरासमोर पाणी साचले होते. रस्त्यांची डागडुजी न झाल्यामुळे खड्डे तयार झाले आहेत आणि यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय येथे लहान लहान बोळी असल्यामुळे पादचाऱ्यांनादेखील चालणे अवघड झाले होते.
न्यू नेहरूनगर
मानेवाडा रोडवरील न्यू नेहरूनगर वसाहतीत ड्रेनेज लाईन नाही. यातच ही वसाहत खोलगट भागात आहे. यामुळे ५०च्यावर घरांमध्ये पाणी शिरले. लोकांना घरातील पाणी कुठे फेकावे हा प्रश्न पडला होता. संपूर्ण परिसरात गुडघाभर पाणी साचून आहे. येथील नागरिकांनी नगरसेवकांना फोन करून अग्निशमन दलाच्या मदतीने पाणी काढण्याची मागणी केली आहे. किशोर धनविजय, महेंद्र प्रसाद, अनिल पाटील, सचिन तोडसी, कृष्णा शंभरकर, देवीदास खोब्रागडे आदींना याचा मोठा फटका बसला.
राजेंद्रनगर, हिंगणा मार्ग
हिंगणा मार्गावरील यशोदानगर, राजेंद्रनगर, गाडगेनगर, म्हाडा कॉलनीतील रस्ते पाण्याखाली आले होते. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागला. अनेकांची वाहने त्यात बंद पडली. पायी जाणाऱ्यांना कसरत करीतच डबके पार करावे लागले. राजेंद्रनगरातील पाणी वाहून जायला जागा नाही. यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.
यशोधरानगर
यशोधरानगर पोलीस ठाण्यासमोरील नाल्याला पूर आला. विशेष म्हणजे या नाल्याला कठडे नाहीत. यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाच नाला समोर पवनसुतनगरातून जातो. रात्रभर पाऊस राहिल्यास नाल्याला पूर येण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तविली आहे. शैलेश गडपायले यांनी सांगितले, उन्हाळ्यात या नाल्याची सफाई होत नाही. यातच हा नाला अरुंद आहे. संरक्षक भिंत नाही. नागमोडी वळण घेत हा नाला समोर गेल्याने जोराचा पाऊस आला तरी हा नाला भरतो. जीवित हानी झाल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मेडिकल चौक
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेडिकल चौक मार्गावर गुडघाभर पाणी साचले. पाण्यातून वाहन हाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांचे वाहन पाण्यात बंद पडले. याचा सर्वाधिक फटका कारचालकांना बसला. पाण्यातून कशीबशी कार काढल्यावर बाहेर पडल्याचा आनंद होत नाही तोच कार बंद पडल्या. काही कार पाण्यात गेल्यावरच बंद पडल्या. दुचाकी वाहनचालकांनी दुचाकी ओढून बाहेर काढल्या पण कार बंद पडल्यावर मात्र नागरिकांच्या सहकार्याने त्या ढकलूनच पाण्याच्या बाहेर काढाव्या लागल्या. सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडत होती. साधारणत: अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर वाहने सुरू झाली पण तोपर्यंत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पण या मनस्तापापेक्षाही पाऊस कोसळतोय याचाच आनंद नागरिकांनी व्यक्त केला. तुकडोजी पुतळा ते मेडिकल चौक या मार्गावरील वृक्षांच्या फांद्या अर्धवट तुटल्याने त्या रस्त्यांवर लोंबकळत होत्या. वाहनचालकांना या फांद्यांचा अडथळा वाहन चालविताना झाला.
बिडीपेठ
मोठ्या ताजबागजवळील बिडीपेठ परिसरात चांगलेच पाणी तुंबल्याने नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाली. महाकाळकर सभागृहाचा मागील भाग आणि नासुप्रचे सक्करदरा तलावाजवळील उद्यानाच्या मागील परिसरातील रस्त्यावर तलावासारखे पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाण्याची पातळी वाढली. यामुळे अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. पाऊस कोसळतच असल्याने संभाव्य धोका लक्षात घेत परिसरातील नागरिक आणि युवकांनी भर पावसातच पाण्याचा निचरा व्हावा म्हणून प्रयत्नाला प्रारंभ केला.

Web Title: Supper chimb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.