सुपरशेफ विष्णू मनोहरांचा नवा विश्वविक्रम, सलग 53 तास केलं कूकिंग
By Admin | Updated: April 23, 2017 18:10 IST2017-04-23T18:10:27+5:302017-04-23T18:10:27+5:30
शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे.

सुपरशेफ विष्णू मनोहरांचा नवा विश्वविक्रम, सलग 53 तास केलं कूकिंग
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांच्या नावावर असलेला सलग 40 तासांचा कुकिंगचा विश्वविक्रम मोडीत काढत सुपरशेफ विष्णू मनोहरांनी नवा इतिहास रचला आहे. रात्री 2 वाजून 56 मिनिटांनी त्यांनी बेंजामीन पेरी यांचा हा विक्रम मोडून काढत सलग 53 तास कुकिंग केलं आहे. तत्पूर्वी सलग 40 तासांचा न थांबता कुकिंग करण्याचा विक्रम अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांच्या नावे होता. मात्र शेफ विष्णू मनोहरांनी हा विक्रम मोडीत काढत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या विक्रमाकरता 375 प्रकारच्या भाज्या, ग्रोसरी, मसाले हे उपयोगात आणले गेले आहेत. लागोपाठ आठ चुलींचा वापर करून विष्णू मनोहरांचा कुकिंगचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. एकाच वेळी त्यांनी तीन ते चार पदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे सुमारे तीनशे ते चारशे किलो जेवण तयार झालं असून, मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअर्स येथे या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली होती. सलग तीन दिवस हा खाद्यपदार्थांचा उत्सव सुरू होता. त्यानंतर आज संध्याकाळी 5.30 ला कुकिंग थांबवलं आहे.या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले गेलेत. त्यातील केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील आहेत.
यावेळी सुपरशेफ विष्णू मनोहर यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. विष्णू मनोहरांनी हा सर्व विक्रम शेतक-यांना समर्पित केला आहे. विष्णू मनोहरांनी आई वडील, पत्नी, मैत्री परिवार, मीडिया, चाहते, सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच शेवटच्या तीन डिशेस अनुक्रमे शेतकऱ्यांची मुले, अन्नपूर्णा देवी आणि शेगावचे गजानन महाराज यांना समर्पित केल्या आहेत.
विक्रमाची वैशिष्ट्यं
- स्वयंपाकासाठी आठ शेगड्यांचा वापर
- एसींनी सुसज्ज स्वयंपाकगृह, चित्रीकरणासाठी होते कॅमेरे, 120 मदतनीस
- दर एक तासाने घेतला पाच मिनिटांचा ब्रेक
- प्रचंड प्रमाणात लागणा-या स्वयंपाकाचे साहित्य होते उपलब्ध
- उपस्थितांना चाखायला मिळाली पदार्थांची चव
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केला होता सराव
- यू ट्युबवरही व्हिडीओ व्हायरल
- संत गजानन महाराज यांच्या पोथीचे केले सलग पारायण