बाळंतिणीची रुग्णालयात आत्महत्या

By Admin | Updated: June 17, 2016 03:03 IST2016-06-17T03:03:17+5:302016-06-17T03:03:17+5:30

शौचास जात असल्याचे सांगून महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) या बाळंतिणीने स्वच्छतागृहातील खिडकीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Suicides in a midwife's hospital | बाळंतिणीची रुग्णालयात आत्महत्या

बाळंतिणीची रुग्णालयात आत्महत्या

लातूर : शौचास जात असल्याचे सांगून महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) या बाळंतिणीने स्वच्छतागृहातील खिडकीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. मात्र आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही़
महादेवी यांचे सासर अंबाजोगाई असून माहेर रेणापूर आहे़ त्यांना पहिला मुलगा असून दुसऱ्या बाळंतपणासाठी त्या लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात रविवारी दुपारी दाखल झाल्या होत्या़ प्रसुती शस्त्रक्रियेनंतर त्यांना दुसराही मुलगा झाला़ त्यांना रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ठेवण्यात आले होते.
महादेवी यांचे वडील शरणप्पा कलशेट्टी गुरुवारी दुपारी जेवणाचा डबा घेऊन आले़ जेवण झाल्यावर त्या स्वच्छतागृहात गेल्या. काही वेळाने अन्य महिला रुग्णाने स्वच्छतागृहाचा दरवाजा ढकलला असता आत महादेवी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़ (प्रतिनिधी)

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी
शासकीय रुग्णालयातील घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ या वेळी महादेवी दमदाडे यांचे पती सोमनाथ दमदाडेंसह त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली.
महादेवी यांना शारीरिक त्रास नसल्याचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांनी सांगितले़ त्यामुळे त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे गूढ अद्यापही कायम आहे.

Web Title: Suicides in a midwife's hospital