शिक्षणाला पैसे नसल्याने आत्महत्या; शेतकरी कन्येने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 00:21 IST2018-11-19T00:20:41+5:302018-11-19T00:21:21+5:30
हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी पैसे नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याच्या मुलीने पिंपरी (शि़) येथे घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली.

शिक्षणाला पैसे नसल्याने आत्महत्या; शेतकरी कन्येने संपविले जीवन
कळंब (जि़ उस्मानाबाद) : हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी पैसे नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याच्या मुलीने पिंपरी (शि़) येथे घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली़ घटनेनंतर संतप्त नातेवाईकानी रविवारी सकाळी तिचे पार्थिव शिराढोण ठाण्यासमोर नेऊन ठिय्या मांडला होता़
कोरडवाहू शेतकरी अविनाश राजेंद्र राऊत यांची मुलगी प्रगती (२०) ही मुरूड (ता. लातूर) येथील संभाजी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होती. तृतीय वर्षात असलेली प्रगती हुशार व होतकरू होती. विविध स्पर्धा परीक्षा देवून नोकरीची संधी आजमावत होती. राऊत यांना केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे़ त्यामुळे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलीच्या शिक्षणाचा खर्च मोलमजूरी करून भागवत होते.
शनिवारी सकाळी प्रगतीने रेल्वेची मुंबई येथील परीक्षा देण्यासाठी व खासगी शिकवणी लावण्यासाठी पैसे लागणार असल्याचे वडिलांना सांगितले होते. राऊत यांनी पाचशे रुपये तिला दिला. आत्ताचा अर्ज भरून घे, मी फायनान्सकडून कर्ज काढून उर्वरित रकमेची सोय करतो, असे तिला सांगितले. त्यानंतर ते पत्नीसह कळंबला कर्ज मिळविण्यासाठी रवाना झाले. दिवसभर धावपळ करून त्यांनी ६० हजारांची रक्कम मिळविली़ मात्र सायंकाळी घरी आल्यानंतर प्रगतीने गळफास घेतल्याचे त्यांना समजले़ मुलीच्या भावास सरकारी नोकरी द्यावी, कुटुंबाला मदत देण्यांसाठी नातेवाईकांनी ठिय्या दिला होता.
न्याय देण्याचे आश्वासन
उपविभागीय अधिकारी डॉ. चारूशिला देशमुख यांनी नातेवाईकांची भेट घेवून मागण्या शासनस्तरावर कळविण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर प्रगतीवर अंत्यसंस्कार झाले.