दुकानात चोरी करणाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 13, 2017 03:37 IST2017-02-13T03:37:34+5:302017-02-13T03:37:34+5:30
शहरातील एका दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. त्यांचा एक साथीदार पळून गेला होता.

दुकानात चोरी करणाऱ्याची आत्महत्या
साक्री (जि. धुळे) : शहरातील एका दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. त्यांचा एक साथीदार पळून गेला होता. त्याने पकडले जाण्याच्या भीतीने सटाणा गावानजीक एका पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले.
साक्री शहरात काही महिन्यांपासून दुकाने व टपऱ्या फोडीचे सत्र सुरू आहे. चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. शुक्रवारी मध्यरात्री डी. आर. पाटील बॅँकेजवळील एका इलेक्ट्रीकल्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकवून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून त्यांनी ३५० रुपये चोरले. त्यानंतर ते बाहेर आले असता, त्यांच्या हालचाली पाहून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांचा माग काढत गढी भिलाटीतून पोलिसांनी गणेश शिंदे व दुसरा अल्पवयीन आरोपी याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार अविनाश पवार पळून गेला. त्याने एकाची मोटारसायकल चोरली आणि तो वेगाने निघून गेला. मात्र सटाणा गावाजवळच्या एका पुलाखाली त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येच्या ठिकाणीच त्याने चोरी केलेली दुचाकी आढळून आली. (प्रतिनिधी)