मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 17:01 IST2016-07-31T17:00:19+5:302016-07-31T17:01:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न करून आणि त्यावर विचार करण्याचे सांगून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना

मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !
ऑलाइन लोकमत
यवतमाळ, दि. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न करून आणि त्यावर विचार करण्याचे सांगून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याच्या मारवाडी येथे शनिवारी घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने युवकांना भविष्य घडविण्याचा संदेशही लिहिला आहे. गोपाल बाबाराव राठोड (२२) असे त्याचे नाव आहे.
वडिलांच्या नावावर असलेली तीन एकर शेती सांभाळून गोपाल हा बोरीअरब येथील कला-वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. व्दितीय वर्षाला शिकत होता. गतवर्षी तो याच महाविद्यालयाच्या आणि नेर येथे वास्तव्याला असलेल्या एका प्राध्यापकाच्या संपर्कात आला. त्यांनी गोपालला शेळीपालनाचा व्यवसाय उभा करून दिला. तेथून १५ दिवसानेच अर्थात शनिवारी सायंकाळी ७ वाजता गोपाल हा या प्राध्यापकाच्या घरी पोहोचला.
त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच तत्काळ रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला हलविले. उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला. गोपालने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ह्यमोदीजी इस सवाल पर बहुत ज्यादा गौर करोह्ण असे सांगून अनेक प्रश्न उपस्थित केले. विविध खेळांच्या चमुमध्ये श्रीमंतांची मुले आहेत. पण ज्यांच्या कष्टामुळे दोन वेळेचे जेवण मिळते त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करावे, अभियांत्रिकीला प्राध्यापकांची मुले एक लाख रुपये भरू शकतात पण शेतकऱ्यांची मुले महाविद्यालयाची फी भरू शकत नाही, त्यांनी काय करावे.
व्यवसायासाठी कर्ज मागितले तर बँका संपत्ती गहाण ठेवायला सांगतात, ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांचे काय, वेतन घेणाऱ्यांना न मागता महागाई भत्ता मिळतो, पण शेतकऱ्यांना भाव मागता मागता कमी होतो असे का, पोलिसात चौकशी शिवाय गुन्हा दाखल होतो हा कुठला नियम आहे, रोजगारासाठी आॅटोरिक्षा चालविणाऱ्यांना पोलिसांना हप्ता द्यावा लागतो, असे का याप्रकारचे प्रश्न गोपालने उपस्थित केले आहे.
कोणाला आपण सुख देऊ शकत नाही तर कमीतकमी दु:ख तरी देऊ नका, त्या जीवनात कुणीही कुणाचे नाही, मेहनत करा आणि स्वत:चे भविष्य घडवा, असा संदेश देणारी चिठ्ठीही त्याने लिहून ठेवली आहे. शेवटी नाव आणि स्वाक्षरी करून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विचार करावा असे म्हटले आहे. चिठ्ठीच त्याने आई, वडील, भाऊ आणि बहिणींची माफी मागितली आहे. सदर युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
वडिलोपार्जीत शेतावर कर्ज
गोपाल बाबाराव राठोड याच्या वडिलोपार्जीत तीन एकर शेतावर युनीयन बँकेचे ७० हजार आणि खासगी एक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील अनेक वर्षांपासूनची नापिकी यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातूनच गोपालने आत्महत्या केली असावी, असे सांगितले जाते.