- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि येऊ घातलेला सणासुदीचा हंगाम या पार्श्वभूमीवर देशातील साखरेच्या दरातही तेजी आली असून गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडील साखरेची विक्री किमान विक्री दरापेक्षा जादा म्हणजेच प्रतिक्विंटल ३१०० रुपयांहून अधिक दराने होत आहे. यामुळे अडचणीतील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. ब्राझीलमध्ये यंदा गेल्या ९० वर्षांतील सर्वांत भीषण दुष्काळ पडला. यामुळे उसाखालील क्षेत्र सुमारे १० टक्क्यांनी घटले आहे. यामुळे येत्या हंगामात ब्राझीलचे साखर उत्पादन ५० लाख टनांनी घटून ३१० ते ३३० लाख टनाच्या आसपासच राहील, असा अंदाज आहे. थायलंडमधील साखरेच्या उत्पादनातही घट होणार असल्याने येत्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा जाणवण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळेच न्यूयार्कच्या वायदे बाजारातील साखरेचे दर शुक्रवारी सुमारे ४ टक्क्यांनी वाढून प्रति पाउंड १८.६२ सेंट्स इतके झाले. हे दर २० सेंट्सपर्यंत जातील, असा वायदे बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची साखर तब्बल सात महिन्यांनंतर प्रथमच तीन ऑगस्ट रोजी प्रतिक्विंटल ३१२० ते ३१५० रुपये दराने विकली गेली.
साखरेचे दर सात महिन्यांनी एमएसपीवर; साखर कारखान्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:09 IST