असा रंगला पुरस्कार सोहळा!
By Admin | Updated: August 5, 2016 05:06 IST2016-08-05T05:06:20+5:302016-08-05T05:06:20+5:30
माध्यमांनी संसदीय लोकशाहीवर टीका करताना विधिमंडळातील चांगल्या कार्याचे सकारात्मक लिखाणाद्वारे कौतुक केले

असा रंगला पुरस्कार सोहळा!
मुंबई : माध्यमांनी संसदीय लोकशाहीवर टीका करताना विधिमंडळातील चांगल्या कार्याचे सकारात्मक लिखाणाद्वारे कौतुक केले तर ही लोकशाही प्रगल्भ होण्यास मदत होईल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधिमंडळ पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केली. या पुरस्कारांच्या निमित्ताने याच सकारात्मकतेच्या दिशेने लोकमतने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे ते म्हणाले.
विधिमंडळाच्या दर्जाबाबत आपण अनेकदा चर्चा करतो आणि तो घसरला असल्याबद्दल चिंताही व्यक्त करतो. त्यातील काही भाग तथ्याचा आणि काही धारणेचा असेल. पण मुळात विधिमंडळात उत्तम कार्य केले तर काही प्रोत्साहन आहे का? कोणी पाठीवर थाप देतो का? उत्तम कार्य करणारी व्यक्ती विधिमंडळातील कामगिरीवर पुन्हा निवडून येतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. लोकमत आणि आर.आर.पाटील फाऊंडेशनने आज आमदारांना पुरस्कृत करून ही कौतुकाची थाप दिली याचा मला सर्वात जास्त आनंद होत आहे. विधिमंडळातील गोंधळाला न्यूज व्हॅल्यू आहे, त्याच्याच बातम्या होतात. तीन तास एखाद्या बिलावर चर्चा झाली, कोण काय बोलले ते लिहायचे तर मेहनत लागते. त्याऐवजी कोणाची कोणाला चपराक वगैरे बातम्या देणे सोपे असतात.लोकशाहीच्या स्तंभांबाबत जी धारणा समाजात निर्माण होत आहे त्या विषयी प्रत्येक स्तंभाने इतरांविषयी विचार केला पाहिजे. लोकमतने पुरस्काराच्या निमित्ताने चांगला पायंडा पाडला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधान मंडळाचे सचिव अनंत कळसे, आ.सुमनताई पाटील, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसुदन अग्रवाल, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे केसरीभाऊ पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.
>आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, आ. सुमनताई पाटील, स्मिता आणि सुप्रिया पाटील यांनी लोकमतने विधिमंडळ पुरस्कार सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत फाऊंडेशनच्या वतीने विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांना मानपत्र प्रदान केले.
>संसदीय आयुधांचे महत्त्व विषद करताना मुख्यमंत्री म्हणाले...
घटनेने संसदीय लोकशाहीची रचना इतकी सुंदर केली आहे की, जगाच्या पाठीवरील असा कोणताही प्रश्न असा नाही की ज्याचे उत्तर तुम्हाला या आयुधाचा उपयोग करून मिळविता येत नाही.केवळ त्यासाठी ही आयुधे समजून घेतली पाहिजेत. त्यांचा योग्य, प्रामाणिक वापर केला पाहिजे आणि संयमाने पाठपुरावादेखील केला पाहिजे. भारतीय संविधानाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘आम्ही सर्व लोक’ अशी सुचविली होती. त्यावर अनेकांनी म्हटले की, संविधानाची सुरुवात देवाच्या नावाने करावी.
त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की, आपल्याला देवलोकाची घटना तयार करायची नसून मनुष्यलोकाची घटना तयार करायची आहे. त्यामुळे मनुष्यरुपी देवाच्या नावानेच घटना तयार करायची आहे. आजची लोकशाही लोकशाही मनुष्यरुपी देवासाठी झटताना दिसते आणि लोकमत पुरस्काराच्या रुपाने ती समृद्ध होताना दिसते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
>पक्षाभिनिवेश बाजूला
ठेवला जातो हीच ताकद
पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या हिताचे निर्णय विधिमंडळात घेतले जातात ही महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीची मोठी ताकद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जात पंचायतविरोधी कायदा १४ एप्रिलच्या (डॉ.आंबेडकर जयंती) पर्वावर व्हावा म्हणून असाच अभिनिवेशन बाजूला सारून दोन्ही सभागृहांनी त्याला १३ एप्रिल रोजी मान्यता दिली, असे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी या बाबत दिले.
एकीकडे लोकमतसारखे प्रभावी वृत्तपत्र आहे आणि दुसरीकडे आर.आर.पाटील जे उत्तम वक्तेच नव्हते तर त्यामागील त्यांची भावना आणि कर्तृत्वदेखील मोठे होते अशा नेत्याच्या नावाचे फाऊंडेशन हा पुरस्कार देत आहे. आज या पुरस्कारामागील भावना आणि इथे व्यक्त झालेले विचार सोबत घेऊन आपण पुढे जाऊयात.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>विधान भवनाच्या पायऱ्यांवर सभागृह !
हल्ली विधिमंडळातील कामकाजाऐवजी विधानभवनाच्या पायऱ्यावरील सभागृहाला नेते मंडळी अधिक पसंती देतात. काहीवेळा तर सभागृहात न बोलेले नेते पायऱ्यांवर येऊन चॅनल्सना बाईट देऊन मोकळे होतात, असा किस्सा दिलीप वळसे पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.