शिरदवाडचे विद्यार्थी गिरवताहेत ‘मोडी’चे धड
By Admin | Updated: February 9, 2015 23:59 IST2015-02-09T23:25:42+5:302015-02-09T23:59:53+5:30
राज्यातील पहिली शाळा : लोप पावणाऱ्या लिपीला मिळणार ऊर्जितावस्था े

शिरदवाडचे विद्यार्थी गिरवताहेत ‘मोडी’चे धड
गणपती कोळी- कुरुं दवाड -- इतिहासकालीन मोडी लिपी लोप पावत असतानाच शिरदवाड (ता. शिरोळ) येथील कुमार विद्यामंदिरात मोडी लिपी शिकविली जात आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिक्षकांनी २२ विद्यार्थ्यांची एक तुकडी तयार केली आहे. या विद्यार्थ्यांना मोडी लिपीत लिहिता व वाचता येते. मोडी लिपी शिकविणारी महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा ठरली आहे. जादा तास घेऊन मुलांना मोडी लिपी शिकविण्याचा या शाळेतील शिक्षकांचा हा अभिनव उपक्रम स्तुत्य ठरला आहे.
मोडी लिपीची सुरुवात १२ व्या शतकात झाली. शिवकाळात ती बहरली आणि पेशवेकाळात देशभर पसरली. तत्कालिन अज्ञापत्र, इनामपत्र, वतनपत्रे, दफातपत्रे, झडती, तहनामा, कतबा, सनद, दस्तऐवज मोडी लिपीतच लिहिली आहेत. मात्र, १९४५ ते ६० या पंधरा वर्षांत मोडीचा वापर कमी होत गेला आणिा ही लिपी हद्दपार झाली.
पूर्वी मोडीचा सर्रास वापर होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील, भूमिअभिलेख, नगरपालिका, आदी कार्यालयातील कागदपत्रे, जन्म-मृत्यू रजिस्टर, शाळांमधील जनरल रजिस्टर ही सर्व मोडीमध्ये होती. मात्र, १९६० नंतर मोडीचा वापरच बंद झाल्याने या लिपीतील मजकूर वाचणारे व लिहिणारेही दुर्मीळ झाले आहेत. परिणामी इनाम पत्रके, सातबारा, जातीचे दाखले, आदींसाठी पूर्वीच्या मोडी नोंदीतील कागदपत्रावरून प्रमाणित दाखला देणे शक्य होत नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. त्यासाठी एखाद्या मोडी लिपी येणाऱ्याचा शोध घेऊन त्याला ‘मुॅँह मॉँगे दाम’ देऊन मजकूर वाचून घ्यावा लागतो. यात वेळ व पैशाचा अपव्यय होतो.
भविष्यकाळात या लिपी विषयी येणारी अडचण, मुलांच्या बौद्धिक विकासात आणखी एका लिपीची भर पडावी, या उद्देशाने आकाराम साळोंखे व बापू आंबी यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी राजाराम काळगे, मुख्याध्यापक रमेश कोळी यांचे सहकार्य मिळत आहे. मुळातच मोडी लिपीबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. या उपक्रमामुळे मोडी शिकविणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जात आहे.
बावीस विद्यार्थ्यांची निवड
पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत नवीन लिपी शिकण्याची आवड असलेल्या बावीस मुलांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. जादा तास घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून आकाराम साळोंखे व बापू आंबी हे शिक्षक विद्यार्थ्यांना मोडी लिपितील बाराखडीपासून शिक्षण देत आहेत. सध्या ही मुले मोडी वाचण्यास व लिहिण्यासही शिकली आहेत.
मोडी लिपीच्या या वर्गासाठी शास्त्रशुद्ध नियोजन केले आहे. मुळाक्षरे, जोडाक्षरे, सोपी वाक्ये, कथा, ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. लुप्त पावत असलेल्या या लिपीेला ऊर्जितावस्था देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना नवीन लिपी अवगत व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
- आकाराम साळोखे,
मोडी लिपीचे शिक्षक, कुमार विद्यामंदिर