मुंबई : विद्यापीठ घोटाळ्याची व्याप्ती वाढत असताना चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून खंडणीचा डाव रचणाऱ्या पोलिसाच्या रडारवर आणखी विद्यार्थी असल्याची माहिती आरोपीच्या चौकशीतून उघड झाली. भांडुप पोलिसांच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्यांची यातून सुटका झाली. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून भांडुप पोलिसांनी प्रफुल्ल बाळकृष्ण भिंगारदिवे (३८) याच्यासह इस्टेट एजंट मिलेश आत्माराम साटम (३८) आणि त्याची प्रेयसी निलोफर सोलकरला अटक केली होती. ठाणे येथील रहिवासी असलेल्या भिंगारदिवेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्याची पोलीस खात्यात नियुक्ती झाली. भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात तो पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होता. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर इन्कम टॅक्स आॅफिसर असल्याची बतावणी करून भिंगारदिवेने पैसे उकळण्यास सुरुवात केली. वागळे इस्टेट आणि रायगड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. अशात मुंबई विद्यापीठाचा पेपर घोटाळा गाजत असताना त्याने यामध्ये हात साफ करण्याचा डाव रचला. साटमच्या मदतीने त्याने विद्यार्थ्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. अशातच त्याचा पहिला शिकार सागर ठरला. सागरने वेळीच भांडुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवशंकर भोसलेंकडे धाव घेतली. भोसलेंच्या तपास पथकाने सतर्कता बाळगून नाहूर परिसरातून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने तिघांनाही १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या चौकशीत सागरपाठोपाठ त्यांच्या मागावर अनेक विद्यार्थी असल्याचे समोर आले. भोसले यांच्या पथकाने वेळीच त्याचा डाव उधळून लावल्याने शिकार ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची सुटका झाली. या प्रकरणी भिंगारदिवेकडे अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)>ठाणे येथील रहिवासी असलेल्या भिंगारदिवेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्याची पोलीस खात्यात नियुक्ती झाली. भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात तो पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होता. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे त्याला बडतर्फ करण्यात आले.