विद्यार्थ्यांनो यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा
By Admin | Updated: August 4, 2016 21:27 IST2016-08-04T21:27:18+5:302016-08-04T21:27:18+5:30
सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला

विद्यार्थ्यांनो यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा
परिमल व्यास : एम. एस. विद्यापीठच्या कुलगुरुंचा सल्ला
मुंबई, दि. ४ : सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला महाराज सयाजी विद्यापीठ बडोदाचे कुलगुरु प्राध्यापक परिमल व्यास यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.
बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि शेठ कानजी व्ही. पारेख कनिष्ठ महाविद्यालयाचा ३७ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यास यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. बी. पंडित, उपाध्यक्ष डॉ. आर. जे. गुजराथी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही. संत, उपप्राचार्य डॉ. एन. बी. आचार्य, उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे, उपप्राचार्य एस. एच. अत्रावलकर आणि निरिक्षक प्रा. एम. एम. बुधकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आपण अनेकदा विविध समस्यांचा सामना करतो. परंतु, आपला अधिक वेळ त्यावर चर्चा करण्यात वाया जातो. तेव्हा चर्चा थांबवून उपाय शोधून लगेच कार्य करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. जागतिकिकरणामुळे आज तंत्रज्ञानाचा सगळीकडे वापर होत असून यामध्ये आपण अधिक लक्ष शहरी भागाकडे देत आहोत. देशाचे महान राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी यापुर्वीच ग्रामीण व शहरी भागाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपययोजनांची माहिती आपल्याला दिली असून त्यानुसार आज काम करण्याची गरज आहे, असेही व्यास यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे डॉ. गुजराथी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगातील आव्हाने आणि जागतिकिकरणा यावर सहजसोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा. पंडित यांनी सध्याच्या युवा भारत देशावर प्रकाश टाकताना युवकांपुढे उभ्या असलेल्या विविध संधी यावर भाष्य केले.
दरम्यान, यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेचर क्लबचे निर्झरा आणि वाड्:मय सभाचे कस्तुरी या हस्तलिखितांचे प्रकाशन झाले. तसेच यावेळी विविध प्राध्यपक व तज्ञ्जांनी लेख लिहिलेल्या ह्यदी क्वेस्टह्ण या अर्थविश्वावरील पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रा. कल्पना गावडे, प्रा. प्राची कदम आणि आशा पट्टे या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार यावेळी झाला