विद्यार्थ्यावर महिलेचे लैंगिक अत्याचार !
By Admin | Updated: April 1, 2015 04:24 IST2015-04-01T04:24:12+5:302015-04-01T04:24:12+5:30
शीतपेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळून एका ४० वर्षीय महिलेने दहावीतल्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. इतक्यावरच न थांबता या महिलेने

विद्यार्थ्यावर महिलेचे लैंगिक अत्याचार !
समीर कर्णुक , मुंबई
शीतपेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळून एका ४० वर्षीय महिलेने दहावीतल्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. इतक्यावरच न थांबता या महिलेने ते क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. त्या जोरावर तिने शारीरिक मुलावर अत्याचार सुरूच ठेवले. तुझ्यासकट कुटुंबाला संपवेन, अशी धमकी देत या महिलेने त्या कोवळ््या मुलासोबत नवी मुंबईतल्या एका मंदिरात लग्नही केले.
हा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला. महिलेच्या अत्याचारापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्याने तक्रार देऊन तीन दिवस लोटले, तरी अद्याप चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदविलेला नाही. चौकशी करू आणि मग कारवाई करू, असे सांगून पोलिसांनी या विद्यार्थ्याची व त्याला पोलीस ठाण्यापर्यंत आणणाऱ्या त्याच्या वडिलांची बोळवण केली. आरसीएफ पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरात हा विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. याच परिसरात आरोपी महिलेचेही घर आहे. हा विद्यार्थी आणि आरोपी महिलेचा मुलगा मित्र. घट्ट मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी त्यांची ये-जा होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हा विद्यार्थी मित्राला शोधण्यासाठी त्याच्या घरी गेला. मित्र घरी नव्हता. मात्र त्याच्या आईने विद्यार्थ्याला थांबवून ठेवले. शीतपेय प्यायला दिले. ते पिताच विद्यार्थ्याची शुद्ध हरपली. ही संधी साधत महिलेने त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. या गडबडीत महिलेने विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो आपल्या मोबाइलने काढले. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेल्या विद्यार्थ्याला घडला प्रकार लक्षात आला. त्याने विचारणा केली तेव्हा महिला भडकली. तिने त्याला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर ती रोजच या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करू लागली.
मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र दहावीच्या परीक्षेचे टेन्शन असल्याचे सांगून तो वेळ मारून नेत होता. काही दिवसांनंतर त्याने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली. त्यानुसार त्यांनी आरसीएफ पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. मात्र त्यावेळी महिलेच्या तक्रारीला घाबरून मुलाने पोलिसांसमोर तोंड उघडले नाही. त्यामुळे पोलिसांनीही या महिलेला समज देत सोडून दिले.
त्यानंतर तर या महिलेचा कहर आणखी वाढला. ती विद्यार्थ्याला बाहेर विविध ठिकाणी भेटू लागली. त्याच्यावर अत्याचार करू लागली. तिने नवी मुंबईतील एका मंदिरात जाऊन या मुलासोबत जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर ती मुलाला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागली. तिची मागणी पूर्ण करण्यासाठी हा विद्यार्थी घरी चोऱ्या करू लागला.
मात्र काही दिवसांनी त्याने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्याने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.