वऱ्हाडी लोकवाङ्मयाच्या जतनासाठी धडपड

By Admin | Updated: August 31, 2015 01:13 IST2015-08-31T01:13:54+5:302015-08-31T01:13:54+5:30

संपूर्ण वऱ्हाड प्रांताला वऱ्हाडी बोली, लोकगीत, लोककथा असा वाङ्मयाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आजवर हा ठेवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत आला आहे़

The struggle for the welfare of the wardry folk | वऱ्हाडी लोकवाङ्मयाच्या जतनासाठी धडपड

वऱ्हाडी लोकवाङ्मयाच्या जतनासाठी धडपड

अतुल जयस्वाल, अकोला
संपूर्ण वऱ्हाड प्रांताला वऱ्हाडी बोली, लोकगीत, लोककथा असा वाङ्मयाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आजवर हा ठेवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत आला आहे़ परंतु अलीकडच्या काळात हा वारसा लुप्त होत असताना तो जतन करून पुढील पिढीला देता यावा, यासाठी अकोला जिल्ह्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने वऱ्हाडी लोकवाङ्मयाचे आॅडिओ व व्हिडीओ संकलन करण्याचे काम हाती घेतले आहे.
वऱ्हाडी बोलीतील लोकगीते, लोककथा, नागदेवतेच्या बाऱ्या संकलित केल्या जात आहेत. वऱ्हाडी बोलीचे वेबपेज तयार करून त्यावर हे लोकवाङ्मय टाकण्यात येणार आहे.
लोणी गावातील डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांनी हा छंद जोपासला असून, या कामात त्यांचा भाऊ मनोज यांची त्यांना साथ लाभत आहे. अमरावती विद्यापीठातून ‘वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर पीएच़डी़ प्राप्त करणाऱ्या रावसाहेब यांनी वऱ्हाड बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या वऱ्हाडी लोकवाङ्मयाचे संकलन करण्याचा ध्यास घेतला आहे. तीन वर्षांत त्यांनी अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये भ्रमंती करून मिळेल त्याच्याकडून लोकगीत, लोककथा, वऱ्हाडी बोली संकलित केली आहे. शेतकरी, गुराखी, वयोवृद्ध स्त्री-पुरुष यांच्याकडून विविध प्रकारची माहिती त्यांनी गोळा केली. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या बाऱ्या म्हणण्याची प्राचीन परंपरा आहे. नागदेवाचे ठाणे असलेल्या गावांमध्ये ‘ठावा’ होतो. तेथे बाऱ्या गायल्या जातात. रावसाहेबांनी या बाऱ्यांचे संकलन केले आहे.
वऱ्हाडी बोलीतील २०० पेक्षा अधिक लोकगीते संकलित करून त्याच्या आॅडिओ-व्हिडीओ सीडी बनविल्या आहेत. आतापर्यंत ३८ लोककथांचे संकलन झाले आहे. लग्नप्रसंगी घेण्यात येणारे उखाणे, वऱ्हाडी बोलीतील ४२६ कोडे, भुलाबाईची गाणी असा लोकवाङ्मयाचा ठेवा त्यांनी संकलित केला आहे.

यू-ट्युबवर भुलाबाईची गाणी, ठाव्याच्या बाऱ्या
भुलाबाईची गाणी हा प्रकार काही वर्षांपूर्वी मुलींच्या आवडीचा विषय होता. हळूहळू भुलाबाई बसविणे कमी होत गेल्यामुळे गाणीही लुप्त होत आहेत. त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी यू-ट्युबचा आधार घेतला आहे. त्यावर बाऱ्या अपलोड केल्या आहेत.
- डॉ. रावसाहेब काळे, वऱ्हाडी वाङ्मयाचे अभ्यासक

Web Title: The struggle for the welfare of the wardry folk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.