‘साहेब’ नसल्याने पोलिसांवर ताण
By Admin | Updated: January 14, 2015 03:55 IST2015-01-14T03:55:57+5:302015-01-14T03:55:57+5:30
राज्यात अपर पोलीस महासंचालक ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तब्बल ६ हजार ७७० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक दोन हजार ९४६ पदे फौजदारांची आहेत

‘साहेब’ नसल्याने पोलिसांवर ताण
राजेश निस्ताने, यवतमाळ
राज्यात अपर पोलीस महासंचालक ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तब्बल ६ हजार ७७० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक दोन हजार ९४६ पदे फौजदारांची आहेत. परिणामी पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र दिसून येते.
महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांचा ३१ आॅगस्ट २०१४ रोजी आढावा घेण्यात आला़ यामध्ये हे वास्तव समोर आले़ गेल्या चार महिन्यांत झालेल्या सेवानिवृत्तींमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पोलीस महासंचालकांची पाच मंजूर पदे भरलेली आहेत. मात्र अन्य पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) समादेशकाची आठ पदे मंजूर असून, यातील तब्बल सात पदे रिक्त आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या समादेशकांची तीनही पदे रिक्त आहेत. श्वान पथक, मोटर परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, शस्त्रागार, सागरी पोलीस दल, वाहतूक, अभियांत्रिकी, भांडारपाल, इलेक्ट्रीशियन, आॅपरेटर या विभागातील विविध पदे रिक्त आहेत.