सीमा भागात तणाव; दोन्ही राज्यांकडून बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 09:35 AM2019-12-29T09:35:36+5:302019-12-29T09:36:33+5:30

कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते.

Stress in border areas of maharashtra; Belgaum-Kolhapur bus transport stopped by both states | सीमा भागात तणाव; दोन्ही राज्यांकडून बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद

सीमा भागात तणाव; दोन्ही राज्यांकडून बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद

Next

मुंबई : कर्नाटकमधील कनसेच्या नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केल्याचे पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काल सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली आहे. 


कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल शिवसेनेने सीमेवर जाऊन तिरडी यात्रा काढत आंदोलन केले होते. यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे कनिष्ठ आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली. तर कोल्हापूर आगारातील कर्नाटकच्या बसगाड्या बाहेर काढण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातून बेळगावकडे जाणाऱ्या कर्नाटकच्या बसना कोल्हापूर बस स्थानकात येण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे या बस स्थानकाच्या बाहेरूनच प्रवाशांना उतरवून कर्नाटकमध्ये रवाना झाल्या.


याचबरोबर कोल्हापूरहून गडहिंग्लजला जाणाऱ्या बसही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. या बसना निपाणीमधून काही अंतर कर्नाटकच्या सीमेतून जावे लागते. या बसवर दगडफेक किंवा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. 

काय केले होते वक्तव्य?
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ''गेल्या 64 वर्षांपासून बेळगावच्या जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि  बेळगावातील कन्नड भाषिकांच्या स्वाभिमानास आव्हान देणाऱ्या, कर्नाटकमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना खासदारांनी कधी जाब विचारला आहे का?, खरंतर मराठी भाषिक एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे  करून गोळ्याच झाडल्या पाहिजेत. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. तसे झाल्यास आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान भीमाशंकर पाटील यांनी केले होते.  

Web Title: Stress in border areas of maharashtra; Belgaum-Kolhapur bus transport stopped by both states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.