स्ट्रॉबेरीच्या गावात पुस्तकांचा मळा!
By Admin | Updated: April 29, 2017 02:21 IST2017-04-29T02:21:20+5:302017-04-29T02:21:20+5:30
सातारा जिल्हयातील भिलार हा गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द आहे. आता या गावाची ओळख स्ट्रॉबेरीसोबतच पुस्तकांचे गाव म्हणूनही आहे.

स्ट्रॉबेरीच्या गावात पुस्तकांचा मळा!
मुंबई : सातारा जिल्हयातील भिलार हा गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द आहे. आता या गावाची ओळख स्ट्रॉबेरीसोबतच पुस्तकांचे गाव म्हणूनही आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज याबाबत माहिती दिली.
या अनोख्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पाचगणी ते महाबळेश्वर मार्गावर पाचगणीपासून ५ किलोमीटरवर असलेल्या भिलार गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.
भिलार गाव पर्यटकांचे आणि रसिक-वाचकांचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०० ते ४५० अशी एकूण सुमारे १५,००० पुस्तके वाचकांसाठी गावात उपलब्ध आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कपाट, टेबल, टी-पॉय, खुर्च्या, सुशोभित छत्री, बिन बॅग इत्यादी वस्तूही पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक किंवा रसिक-वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. २५ ठिकाणांचे (घरे व सार्वजनिक जागा) सुसज्ज व सुंदर ग्रंथालयांत रुपांतर करण्यात आले. ७५ चित्रकारांनी २५ ठिकाणे सजवली आहेत. ४ मे च्या कार्यक्रमानिमित्त डॉ. सदानंद मोरे, बाबा भांड, दिलीप करंबेळकर, अरुणा ढेरे, पांडुरंग बलकवडे, राजन गवस, अशोक नायगावकर असे अनेक मान्यवर पुस्तकप्रेमींशी गप्पा आणि मार्गदर्शन करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)