कोकणातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन!
By Admin | Updated: January 18, 2015 01:07 IST2015-01-18T01:07:56+5:302015-01-18T01:07:56+5:30
शेतीच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या कोकणातील वातावरणास छेद देत कृतिशील महिला शेतकऱ्याने माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती पिकवली आहे.

कोकणातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन!
आदर्शवत शेती : कृतिशील महिला शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
कपिल गुरव ल्ल आचरा (जि़ सिंधुदुर्ग)
शेतीच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या कोकणातील वातावरणास छेद देत कृतिशील महिला शेतकऱ्याने माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती पिकवली आहे. कोकण म्हटले की, नजरेसमोर येतो तो विस्तीर्ण समुद्रकिनारा. दमट आणि खाऱ्या हवामानात बहरणारा फळांचा राजा हापूस, नारळ, सुपारी, काजूच्या बागांनी बहरलेला भूप्रदेश, खाडीपात्रात आणि सागरकिनारी चालणारी मासेमारी. एकूणच अशा वातावरणात इतर पिके घेणे तसे आव्हानच़ मात्र, हे आव्हान पेलले आहे ज्योती गोलतकर यांनी़ देवगड-आचरा-मालवण या हमरस्त्यावरील चिंदर सडेवाडी येथील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती त्यांनी केली़
ज्योती यांनी शेतीतील एक आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा इतर शेतकऱ्यांना वास्तुपाठ घालून दिला आहे़ राज्य शासनाच्या फलोद्यान योजनेचा आधार घेत कोकणवासीयांनी परंपरागत शेतीकडे पाठ फिरवत भरघोस उत्पन्न देणाऱ्या आंबा-काजूच्या बागा फुलविल्या. अलीकडच्या काळात निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे आंबा-काजू पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेले पीक काहीवेळा वाया जात आहे. माती परीक्षण केले़ मातीबद्दल तज्ज्ञांच्या अहवालानंतर शेतात विविध फळे,
फुले, भाजीपाला पिकवता येऊ शकतो,
हे ज्योती यांनी जाणले आणि मग
व्हॅनिलाची लागवड केली़ याला यश आल्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
महाबळेश्वर आणि आचरा भागातील तापमानामध्ये चार-पाच डिग्रीचाच फरक आहे. फक्त या परिसरात दुपारचे प्रखर ऊन सोडले तर बाकी वातावरण महाबळेश्वरशी मिळतेजुळते. गरज होती ती फक्त अथक परिश्रमांची आणि वातावरण नियंत्रित ठेवण्याची.
महाबळेश्वर येथील काही शेतकऱ्यांच्या साहाय्याने ज्योती यांनी गेल्या वर्षी प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी शेती करण्यास सुरुवात केली. या स्ट्रॉबेरी शेतीच्या प्रयोगामध्ये कोणतेच रिवार्इंड बटण नसून एखाद्या जैविकाचा किंवा खताचा डोस चुकला तर सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता अधिक असते़
सुरुवातीचे एक वर्ष केवळ प्रायोगिक तत्त्वावर केलली लागवड यशस्वी झाल्यामुळे ज्योती गोलतकर यांचा उत्साह वाढला. ८ गुंठे जमिनीत कॅमेरोजा आणि विंटरडाऊन या जातीच्या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. प्रखर उन्हावर नियंत्रण मिळविण्याकरिता स्प्रिंकर्लर्स आणि पाण्याचा सुयोग्य मेळ साधला आहे. दरदिवशी ३० किलोपर्यंत उत्पन्न येत असून, किलोमागे २०० रुपयांचा बाजारभाव त्यांना स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे.