आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको
By Admin | Updated: August 15, 2014 00:42 IST2014-08-15T00:42:49+5:302014-08-15T00:42:49+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत

आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको
शेकडोंना अटक व सुटका : तासभर वाहतूक विस्कळीत
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत आरक्षणाची मागणी लावून धरली. दरम्यान तासभर वाहतूक खोळंबली. त्यामुळे शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
धनगर समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून नागपूरसह राज्यभरात सातत्याने आंदोलन सुरू आहे. यापूर्वी साखळी उपोषण सुरू होते. गुरुवारी राज्यस्तरीय रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपुरात धनगर समाज संघर्ष समितीतर्फे डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात वर्धा रोड या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव आणि सावनेर रोड टी पॉर्इंटवरील मोहपा या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने धनगर समाजबांधवांनी रास्ता रोको केला. दुपारी १२.३० वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान तब्बल तासभर वाहतूक जाम होती. दोन्ही ठिकाणी जवळपास ५०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व काही वेळानंतर सोडून दिले.
आंदोलनकर्त्यांनुसार गेल्या ६५ वर्षांपासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये ३६ व्या क्रमांकावर ओरॉन, धनगर या जमातीचा समावेश केलेला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात या आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. इंग्रजी लिपीत धनगड तर देवनागरीत धनगर असा उल्लेख होतो. केवळ ‘ड’ आणि ‘र’ च्या अक्षरफरकामुळे या समाजास अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करण्यापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कासाठी आम्ही लढत आहोत. १३ आॅगस्ट २०१४ ला झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनगर व इतर समाजासाठी तिसरी सूची तयार करून त्या तिसऱ्या अनुसूचित या समाजाला समाविष्ट करावे, अशी शिफारस करण्याचा ठराव मंजूर केला आहे. परंतु ही बाब धनगर समाजाला अमान्य आहे.
आंदोलनात बबनराव लोखंडे, अजय बुधे, अरुण माहुरे, राजेंद्र पाटील, दिलीप डाखोळे, वामन तुरके, देवेंद्र उगे, देवीदास घायवट, शेषराव पडवे, शामराव खुजे, ज्ञानेश्वर घायवट यांच्यासह शेकडो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)