राज्याचे एकात्मिक पार्किंग धोरण लवकरच येणार! आधी अंमलबजावणी एमएमआर क्षेत्रात, मंत्री सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:20 IST2025-05-20T14:20:12+5:302025-05-20T14:20:22+5:30

या धोरणाची सुरुवातीला  अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये करण्यात येईल, असे सरनाईक यांनी या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगितले.

State's integrated parking policy to come soon! First implementation in MMR area, informs Minister Saranaik | राज्याचे एकात्मिक पार्किंग धोरण लवकरच येणार! आधी अंमलबजावणी एमएमआर क्षेत्रात, मंत्री सरनाईक यांची माहिती

राज्याचे एकात्मिक पार्किंग धोरण लवकरच येणार! आधी अंमलबजावणी एमएमआर क्षेत्रात, मंत्री सरनाईक यांची माहिती

 
मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी एकात्मिक पार्किंग धोरण  आणले जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितले. 

या धोरणाची सुरुवातीला  अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये करण्यात येईल, असे सरनाईक यांनी या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगितले. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि एमएमआरमधील महापालिका आयुक्त  उपस्थित होते. 

सूचना, अभिप्राय मागवून विचारमंथन करणार
मंत्री सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी राहू नयेत यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने पार्किंग जागा विकसित करायला हव्यात.

पार्किंगसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? 
प्रत्येक महापालिकेने उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ उत्तम उदाहरण आहे. 

रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलिस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोइंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. 
तसेच आरक्षित जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्वीकारावे जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल, असे सरनाईक म्हणाले.
 

Web Title: State's integrated parking policy to come soon! First implementation in MMR area, informs Minister Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.