राज्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:55 IST2019-04-15T06:55:09+5:302019-04-15T06:55:16+5:30
राज्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाºयासह झालेल्या पावसाने तडाखा दिला.

राज्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून पाच जणांचा मृत्यू
नाशिक/पुणे/नगर : राज्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाºयासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. रविवारी नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी आणि आंबा पिकाचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात वीज पडून तीन विद्यार्थी व एक महिला, तर नगर जिल्ह्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला.
नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. दिंडोरी तालुक्यात मौजे मानोरी येथे वीज पडून सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड हे तीन विद्यार्थी व चांदवड तालुक्यात खडक ओझर येथे जनाबाई सुभाष गिरी (४०) यांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शनिवारी रात्री राहुल बाळासाहेब पवार (३३) या शेतकºयाचा वीज पडून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात वादळाने घराची भिंत पडून पाच जण जखमी झाले. नेवासा तालुक्यात वादळाने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी खांबावर चढलेले कंत्राटी कामगार नितीन राजेंद्र घोरपडे (२४) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. कर्जत येथे विजेची तार तुटल्याने दोन बैल ठार, तर गुराखी जखमी झाला. पावसाने फळबागांचे नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यात दुसºया दिवशीही वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. खेड शिवापूर, यवत, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागापासून घोडेगावपर्यंत वादळी पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात पावसाने केळीचे खांब आडवे झाले.
>पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५ अंश तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.