कोल्हापूर: चीनमधील एचएमपी विषाणूचा (HMPV Virus) आता भारतातही शिरकाव झाला आहे. कर्नाटक तसेच गुजरातमध्ये एचएमपीव्हीचा रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा संतर्क झाली असून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यावर राज्याचे सार्वजानिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रीप्रकाश आबिटकर यांनी नागरिकांनी काळजी करू नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले. तसेच इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देवून सुविधांबाबत पाहणी केली.इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक डायलेसिस व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण मंत्री आबिटकर यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी एचएमपी विषाणूबाबत बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, सोशल मीडिया तसेच एकमेकांच्या बोलण्यामधून विनाकारण भिती निर्माण होते. येत्या एक-दोन दिवसात बैठक घेवून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येतील. नागरिकांनी न घाबरता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे सांगितले.
तसेच आयजीएम रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणत भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. यावेळी आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील उपस्थित होते. तसेच येणाऱ्या रुग्णांना केसपेपर वेळेत मिळावा यासाठी तयार करण्यात आलेल्या डीजी हेल्थ या मोबाईल एप्लिकेशन चे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयातील आवश्यकतेनुसार आमदार राहुल आवाडे यांनी 200 चे 300 बेडमध्ये रुग्णालय रुपांतरीत करणे, एम.आर.आय., आधुनिक शस्त्रक्रिया विभाग यासह विविध सुविधा सुरु करण्याची मागणी केली. यावर मंत्री आबिटकर यांनी मी आलोय आणि पाहणी केली आहे, असे सांगून खऱ्या अर्थाने रुग्णसंख्या पाहून मागणी केलेल्या सुविधांची गरज असल्याचे सांगितले. मनुष्यबळाची नेमणूक करण्यासाठी पदनिर्मिर्ती करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. तोपर्यंत कंत्राटी स्वरुपात आवश्यक मनुष्यबळ देवू, असे सांगितले.