मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठीचा जीआर राज्य सरकारकडून आज किंवा उद्या काढला जाऊ शकतो. सध्या मराठवाड्यासह विदर्भातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आणखी 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. याआधी 1 नोव्हेंबर 2018 रोजी 250 मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. विशेष म्हणजे त्याच्या एक दिवस आधीच (31 ऑक्टोबर) सरकारनं 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. ऑक्टोबर अखेरीस राज्य सरकारनं 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत केला होता. यातील 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचं सरकारनं आपल्या परिपत्रकात म्हटलं होतं. तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने तोंड फिरवल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं आणि विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता.
आणखी 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:49 IST