गौरव सोहळ्यात रंगणार राजकीय जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 05:03 IST2016-08-01T05:03:14+5:302016-08-01T05:03:14+5:30
विधिमंडळात नेमके होते तरी काय, हा प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतो.

गौरव सोहळ्यात रंगणार राजकीय जुगलबंदी
मुंबई : विधिमंडळात नेमके होते तरी काय, हा प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतो. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले हे मान्यवरांकडून याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘संसदीय कार्यात महिला लोकप्रतिनिधींचे योगदान आणि त्यांना येणाऱ्या अडचणी’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे करणार आहेत तर ‘विधिमंडळ गोंधळासाठी की कायदे बनविण्यासाठी’ यावर राजकीय विश्लेषक माजी आ. उल्हास पवार हे ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च अशी राजकीय मेजवानी आणि जुगलबंदी अनुभवता येणार आहे. ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा सोहळा रंगणार असून, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विधिमंडळ गोंधळासाठी की कायदे बनविण्यासाठी, या परिसंवादात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख सहभागी होणार असून राजकीय विश्लेषक माजी आ. उल्हास पवार हे सूत्रसंचालन करणार आहेत.
एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना लिलया समोरे जाणारे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी गृहमंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप सोपल आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे या कार्यक्रमात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या खुसखुशीत प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
विधीमंडळात महिला आमदार कोणते प्रश्न उपस्थित करतात? या विषयावर आ. मंदा म्हात्रे, आ. निलमताई गोऱ्हे, आ. विद्या चव्हाण आणि आ. यशोमती ठाकूर यांच्याशी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे संवाद साधणार आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील फाउंडेशन प्रस्तुत या पुरस्कार सोहळ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (विशेष प्रतिनिधी)