"मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही"; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:18 IST2025-10-15T11:14:13+5:302025-10-15T11:18:17+5:30
निवडणूक मतदार याद्यांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले.

"मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही"; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर
Election Commission: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांतील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. मंगळारी विरोधकांनी निवडणूक आयोग्याच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं होतं. दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा विरोधकांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे,मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. मंगळवारी विरोधकांच्या शिष्टमंडळासोबत आयोगाच्या कार्यालयात आज बैठक झाली. विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरणत देत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या यादीचा उल्लेख केला.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो. त्यानुसार १ जुलै २०२५ या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात, मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदभांतील दुरूस्त्यांबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात," असं आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलं.
दरम्यान, नवी मतदार आणि वगळलेले मतदार यांची यादी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. तसेच व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेवू नये अशी ही मागणी करण्यात आली. मतदान नोंदणी का बंद करण्यात आली यासह जी बोगस नावे आहे ती वगळली जावी अशी मागणी विरोधकांनी आयोगाकडे केली आहे.