गरिबांकरिता स्वतंत्र बँका सुरू करा
By Admin | Updated: September 7, 2015 01:53 IST2015-09-07T01:53:12+5:302015-09-07T01:53:12+5:30
सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे

गरिबांकरिता स्वतंत्र बँका सुरू करा
मुंबई : सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, अशी सूचना नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी रविवारी केली.
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी युनुस यांची भेट घेऊन चर्चा केली. गरीबी निर्मूलनाकरिता बांगलादेशात राबवण्यात येत असलेल्या प्रयोगांची माहिती युनुस यांनी दिली. ग्रामीण बँकेचा
प्रयोग, सूक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. जगभरातील बहुतांश गरीब समाज बँकींग क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता त्यांना बँकींग क्षेत्रात आणले पाहिजे. कर्जाची परतफेड गरिबांकडून जास्त प्रमाणात होते असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. याकरिता प्रस्थापित व्यावसायिक बँकांऐवजी गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करणे गरजेचे आहे.
बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के सहभाग गरीब महिलांचा होता. या चळवळीत कर्ज परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के होते. या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबर आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या महिलांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ग्रामीण बँकेमार्फतच सामाजिक उद्योगाच संकल्पना राबवण्यात आली, असे युनुस यांनी सांगितले.
गरिबांना दया दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा व महिला सक्षमीकरणाचा हा बांगलादेशातील प्रयोग महाराष्ट्रात अमलात आणण्यात येईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना सुपर हॅप्पीनेस ग्रुप बनवण्याकरिता शासन प्रयत्न करील, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)