माळशेज घाटातील रस्त्याला तडे

By Admin | Updated: August 7, 2016 02:25 IST2016-08-07T02:25:40+5:302016-08-07T02:25:40+5:30

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचा जोर कायम आहे. या घाटमार्गानंतर पुणे जिल्ह्याच्या हद्दीत एमटीडीसी रिसॉर्टपासून पुढे चार किलोमीटरच्या

Stairs on the road in Malsege Ghat | माळशेज घाटातील रस्त्याला तडे

माळशेज घाटातील रस्त्याला तडे

ठाणे / शिरोशी : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचा जोर कायम आहे. या घाटमार्गानंतर पुणे जिल्ह्याच्या हद्दीत एमटीडीसी रिसॉर्टपासून पुढे चार किलोमीटरच्या रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे हा रस्ता खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील दोन्ही बाजूंकडील वाहतूक अघोषित काळासाठी बंद केली आहे.
घाटात पाऊस आणि धुके मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे. त्यातच, शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत या महामार्गावरील वेळ खिंडीच्या पुढे करंजाळे गावाजवळ रस्त्याला मधोमध तडा गेला आहे. परिणामी, रस्ता ७५ फूट लांब व सुमारे १० फूट खोल खचला आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक बंद केल्याचे ठाणे महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी सांगितले.
घाटातील पावसाचा जोर पाहता कोणत्याही क्षणी दरडी व झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. माळशेज घाटातील मढ, खुबी, खिरेश्वर, करंजाळे आदी परिसरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी महामार्गावरून वाहत आहे. यामुळे रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)

- घाटात पडलेल्या दरडींचा ढिगारा त्याच वेळी उचलून रस्ता मोकळा करण्यात आला होता. त्यानंतर, एक दिवस घाटातील रस्त्यांची पूर्ण पाहणी करण्यात आली. त्यानुसार, वाहतुकीसाठी घाटमार्ग योग्य आहे. परंतु, घाटरस्त्याव्यतिरिक्त पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात रस्ता खचल्यामुळे वाहने पुढे येणे शक्य नाही. त्यामुळे या घाटातील दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद आहे.

Web Title: Stairs on the road in Malsege Ghat