प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ॲप’ली एसटी... क्लिकसरशी कळणार ठावठिकाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 09:39 IST2023-10-08T09:36:34+5:302023-10-08T09:39:02+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) ॲप तयार केले असून नोव्हेंबरपासून ते कार्यान्वित होणार आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ॲप’ली एसटी... क्लिकसरशी कळणार ठावठिकाणा
मुंबई : एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती इ. इ. माहिती आता प्रवाशांना एका क्लिकसरशी मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) ॲप तयार केले असून नोव्हेंबरपासून ते कार्यान्वित होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास प्रवासीपूरक बनविण्यासाठी शिवसेना- भाजप महायुती सरकारच्या काळात, ऑगस्ट, २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. कोरोना आणि एसटी संप यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. प्ले स्टोअरवर ‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप प्रवाशांना वापरता येईल.
ॲपमध्ये काय?
- ॲपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी सुविधा देण्यात आलेली आहे.
- एसटी नियंत्रण कक्ष, पोलिस, रुग्णवाहिका यांना थेट फोन करण्याची सुविधाही या ॲपमध्ये असेल.
प्रवाशांच्या भविष्यातील गरजा ओळखून तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी सेवांमध्ये प्रवाशांच्या हिताचे बदल करण्यात येत आहे. प्रवाशांना एसटीचा नेमका ठावठिकाणा समजण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी हे ॲप तयार केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ॲपसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
- एसटी प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधाही या ॲपमध्ये असेल.
- तक्रारींमध्ये ‘वाहक-चालक’, ‘बसस्थिती’, ‘बससेवा’, ‘ड्रायव्हिंग’, ‘मोबाइल ॲप’ असे वर्गीकरण या भागात केले जाईल.
- प्रवाशांनी संबंधित विषयाबाबत तक्रार देताना मोबाइल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाइन नोंदवावा लागेल.