नामदेव अध्यासनातून संतवाङ्मयाचा प्रसार
By Admin | Updated: July 31, 2016 00:54 IST2016-07-31T00:54:30+5:302016-07-31T00:54:30+5:30
संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली.

नामदेव अध्यासनातून संतवाङ्मयाचा प्रसार
पुणे : संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून समता आणि प्रभु-भक्तीची शिकवण दिली. संतवाङ्मयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार तसेच, राष्ट्रीय एकात्मता साधणे यादृष्टीने १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्यात आले.
संत नामदेवांवरील साहित्याची सूची, नामदेवांच्या गाथेचे नव्याने संपादन असे प्रकल्प अध्यासनाच्या माध्यमातून राबवले गेले असून, ते पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न होत आहेत. गाथेच्या संपादनासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांची संपादन समिती स्थापन करण्यात आली. हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यासनावर अभ्यासू व्यक्तीची निवड करून प्रकल्पांना गती मिळावी, यादृष्टीने विद्यापीठाकडून एक समिती नेमली असून समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्त केला आहे.
पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन झाल्यानंतर १९८५ ते २००० अशी १५ वर्षे डॉ. अशोक कामत यांनी या अध्यासनाचे नेतृत्व केले. या अध्यासनाने लोकाश्रय मिळवून सुमारे दीडशे शोधप्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुरे केले. नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळवणे, अध्यासनाचे ग्रंथालय, भारतीय संतसाहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील, असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही धुरा अविनाश आवलगावकर यांच्याकडे आली. त्यांनी पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ ‘१९ व्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली.
>एका वर्षात उभारले दोन मजली महाविद्यालय
घुमान येथील साहित्य संमेलनानंतर आकारास आलेल्या ‘बाबा नामदेव महाविद्यालया’चे उद्घाटन दि. १७ जुलै रोजी करण्यात आले. पंजाबमधील घुमानमध्ये मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले.
यात भारतीय भाषा भवन आणि महाविद्यालयाची घोषणा केली होती.
त्यानुसार महाविद्यालयाचे भूमिपूजन संमेलनादरम्यान झाले होते. एका वर्षात दोनमजली महाविद्यालय उभे राहिले असून, त्याला ‘बाबा नामदेव महाविद्यालय’
असे नाव दिले आहे.
अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याच्या कामाला वेग आला असून त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीही बोलणी सुुरू आहेत.