Abu Azmi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अनेक मुद्दे गाजताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशभरात होणाऱ्या शहरांच्या नामांतरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहराचे नामांतरण करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मागणी केली होती. यावर आता सपा आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. यावरून मोठा वाद राज्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहाराचे नाव बदलावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली. मूळात हे नामांतर नाही, तर झालेली चूक दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावा शिरसाट यांनी केला. यावर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली.
...तर आम्ही स्वागतच करू
जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे. एखादे नवे शहर वसवले असते तर वेगळा मुद्दा होता. माझे म्हणणे आहे की, जर नाव बदलल्यामुळे महागाई संपुष्टात येणार असेल, नाव बदलल्यामुळे बेरोजगारी संपणार असेल, नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही स्वागत करू. नावे बदलण्याचा मुद्दा काढून देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. देशात महागाई वाढली आहे. इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावट नसावा. शेजारील देश चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी म्हणाले.
दरम्यान, खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपूर होते. हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनी येथे जी सत्ता उपभोगली, ते जे शेतसारा वसूल करायचे त्यातही रत्नपूर असेच लिहिलेले आहे. म्हणून आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही. तसेच, दौलताबाद हे दौलताबाद नाही तर देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटले जात होते आणि राजा रामदेवरायांचे तेथे राज्य होते. आता दौलताबाद किल्ला काही औरंगजेबाने बांधला आहे का? नाही. ती असलेली वास्तू, तेथे राज्य केले आहे. आपण हे जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नाही, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचे कारण एक आहे, आम्ही जी औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको का? अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली होती.