रुग्णांचे काही प्रमाणात हाल

By Admin | Updated: October 15, 2015 02:37 IST2015-10-15T02:37:28+5:302015-10-15T02:37:28+5:30

देशासह राज्यातील केमिस्टस्नी औषधांची दुकाने २४ तास बंद ठेवल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेत. केमिस्टचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेकांना औषधांसाठी वणवण करावी लागली

Some of the patients | रुग्णांचे काही प्रमाणात हाल

रुग्णांचे काही प्रमाणात हाल

मुंबई: देशासह राज्यातील केमिस्टस्नी औषधांची दुकाने २४ तास बंद ठेवल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेत. केमिस्टचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेकांना औषधांसाठी वणवण करावी लागली. मोठ्या रुग्णालयांजवळील औषधांची काही दुकाने मात्र सुरू होती. तथापि, अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईनमुळे अनेकांना फायदा झाला.
औषधाची दुकाने बंद असली, तरीही रुग्णालयातील औषधांची दुकाने सुरू होती. या दुकानांमध्ये आधीच पुरेसा साठा करून ठेवल्यामुळे रुग्णांचे हाल कमी झाले. पेनकिलरसारखी औषधे घेण्यासाठी, बॅण्डेज, ग्लोज अशा नेहमीच्या गोष्टी घेण्यासाठीही बराच वेळ ताटकळत राहावे लागले. मुंबईत संपाचा मोठा परिणाम मुंबईत जाणवला. रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून मोठ्या रुग्णालयांच्या परिसरातील एक-एक औषधाचे दुकान सुरू ठेवण्यात आले होते, पण इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
>देशासह राज्यातील केमिस्टस्नी आॅनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामध्ये जनतेचे हाल होऊ नयेत, म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हेल्पलाईन क्रमांक दिले होते. या क्रमांकाचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला. वांद्रे-कुर्ला संकुलातील एफडीएच्या मुख्य कार्यालयात सायंकाळपर्यंत ७० कॉल्स आले होते. एफडीए अधिकाऱ्यांनी ही अनेकांना औषधे मिळण्यासाठी सहकार्य केले. मुंबईतील अधिकाऱ्यांना ४० कॉल्स आले होते, तर विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना १५० कॉल्स आले. औषधांची गरज आहे, दुकाने बंद आहेत, कुठे औषधे मिळतील? यासाठी हे कॉल्स आल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
>धरणे आंदोलन
औषधांच्या आॅनलाईन विक्रीविरोधात देशव्यापी संपात उतरलेल्या औषध विक्रेत्यांनी बुधवारी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकत धरणे दिले. कोणत्याही सरकार किंवा शासनाविरोधात हे आंदोलन नसून, औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले.
रूग्णांचे हाल होऊ नये, म्हणून महत्त्वाच्या रूग्णालयांशेजारी एक ते दोन औषधांची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी संघटनेने दिल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत औषध विक्रेत्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने संपाचा उद्देश सफल झाल्याचेही नावंदर म्हणाले. जेजे रूग्णालयाजवळील एका दुकानाचा अपवाद वगळता, सर्व औषधांची दुकाने बंद होती.
>कोकणात संमिश्र प्रतिसाद
ठाणे : अनधिकृत आॅनलाईन औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी मेडिकल दुकाने बंदला कोकण विभागात संमिश्र प्रतिसाद लाभला. एकीकडे (कोकण विभाग) मेडिकल असोसिएशनने १०० दुकाने बंद असल्याचा दावा केला असला, तरी दुसरीकडे एफडीएने आखलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांचे हाल झाले नसल्याचे सांगून, दोन हजार दुकाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी कोकण विभागात ४२२ होलसेल आणि १ हजार ८११ किरकोळ दुकाने सुरू होती. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात १४५ होलसेल आणि एक ४३२ किरकोळ दुकान विक्रेत्यांचा समावेश असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.

Web Title: Some of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.