'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:26 IST2025-10-24T20:23:51+5:302025-10-24T20:26:05+5:30
बेदाग प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे असं शिंदेंनी म्हटलं.

'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित ठेवावे. भविष्यात जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मोदींचा करिष्मा काय होता हे सर्वांना कळेल. या पुस्तकातील काही भाग शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या पुस्तकातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेले ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे पार पडले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर यापूर्वी अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत. मात्र ‘मोदीज मिशन’ हे केवळ चरित्र नसून त्यांच्या कार्याचा, दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा सत्यदर्शी आलेख आहे. मोदींचे व्यक्तिमत्व एका पुस्तकात सामावणे अशक्य आहे. मोदी हे नाव देशाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे. मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट आला, पण नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षांत खरोखरच ‘इम्पॉसिबल’ काम शक्य करून दाखवले आहे. या काळात देशात झालेला बदल हा सकारात्मक आणि व्यावहारिक आहे. आज जग भारताकडे आदराने पाहत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि आईचे आशीर्वाद आहेत. कामाप्रती डेडिकेशन व डिवोशन ही त्यांची ओळख आहे. मेहनतीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी. गुजरातच्या वडनगरमधून देशाला असा हिरा लाभला, ज्याने करोडो कष्टकऱ्यांचे जीवन उजळून टाकले आहे. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या वातावरणात सत्य मांडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी लेखक बर्जिस देसाई यांचे कौतुक केले.
दरम्यान, आज भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या स्थानावरून चौथ्या स्थानी आली आहे आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. हे मोदींमुळेच शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांद्वारे भारताचा डंका जगभर वाजत आहे. मोदींनी शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे जीवन बदलले आहे. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. याआधी ‘गरीबी हटाव’चा नारा देण्यात आला पण गरीबच हटवले गेले, मात्र मोदींनी खरोखरच गरिबी हटवली असा टोला एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला लगावला.
◻️LIVE📍राजभवन, मुंबई 🗓️ 24-10-2025 📹 मा. राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत 'मोदीज मिशन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा - लाईव्ह
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 24, 2025
https://t.co/WnRyM5ismL
"लोकांच्या हृदयावर राज्य करणारा एकच नेता नरेंद्र मोदी"
मोदींनी महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना सन्मान मिळवून दिला. गेल्या अकरा वर्षांत देशाचा विकास वेगाने झाला आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग मोदींवर लागला नाही. बेदाग प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे. मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. लोकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता कोण, याचे उत्तर फक्त एकच नरेंद्र मोदी असं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.