इतिहासाच्या साक्षीदाराची एकाकी झुंज

By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:18:01+5:302014-11-24T23:04:21+5:30

सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिवस : २५ नोव्हेंबरला ३५० वर्षे पूर्ण ; शासनाकडून उपेक्षा

The solitary conflicts of history witness | इतिहासाच्या साक्षीदाराची एकाकी झुंज

इतिहासाच्या साक्षीदाराची एकाकी झुंज

संदीप बोडवे - मालवण -छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रतिक असलेला सिंधुदुर्ग किल्ला केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची शान आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासात किल्ल्याचे महत्व मोठे आहे. छत्रपतींच्या ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याची पायाभरणी २५ नोव्हेंबरला झाली. मात्र दुर्दैवाने जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या पायाभरणीचा दिवस अजूनही उपेक्षित राहिला आहे.
स्वराज्याच्या काळात दक्षिणेत पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांचे आरमारी सामर्थ्य वाढत असल्याचे धुरंधर राजाने जाणले होते. अरबी समुद्रावर मराठ्यांचेही वर्चस्व असावे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी कोकणची मोहिम आखली. शिवाजी महाराज आपल्या लवाजम्यासह मालवण येथे दाखल झाले. मालवण बंदरातून अथांग अरबी समुद्र न्याहाळताना महाराजांची नजर समुद्रातील ‘कुरटे’ बेटावर स्थिरावली. ‘चौऱ्यांशी बंदरी ऐसी जागा मिळणार नाही’ असे शब्द महाराजांच्या तोंडून बाहेर पडले. यवन आणि फिरंग्यांच्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी येथे जलदुर्ग बांधणे आवश्यक असल्याचे त्यांच्या नजरेने हेरले. किल्ला बांधायचा तर लोकांचा विश्वास आणि सागराचा आशिर्वाद महत्वाचा असल्याचे त्यांनी जाणले आणि मालवणच्या कुरटे बेटाचे भाग्य उजळले.
मार्गशीर्ष शके १५८६ द्वितीय २५ नोव्हेंबर १६६४ हा दिवस महाराजांनी किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसविण्यासाठी निवडला. किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरत लुटून मिळविलेले एक कोटी होन खर्च करण्याचे निश्चित झाले. मुहूर्ताचा दिवस उजाडला. पूजा मंत्र सांगायला स्थानिक ब्राह्मणच हवा असा शिवाजी महाराजांचा आग्रह होता. वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर आणि वेदमूर्ती दादंभट यांना आणायला पालखी पाठविण्यात आली. शिवरायांना मदत करणे म्हणजे त्यांच्या शत्रूकडून समुद्रात बुडवून ठार मारण्याची भीती.
तसेच समुद्र गमन न करण्याचा रिवाज यावेळी आड आला. महाराजांनी विश्वास दिला. तरीही रिवाज मोडून समुद्रातील कुरटे बेटावर जाण्यास ब्राह्मणांनी स्पष्ट नकार दिला. बरीच मनधरणी केल्यानंतर किनाऱ्यावरच किल्ल्याचे भूमिपूजन करण्याचे ठरले.
मालवण देऊळवाडा येथील जानभट अभ्यंकर आणि दादंभट बिन पिलंभर उपाध्ये यांनी मालवण दांडी जवळच्या किनाऱ्यावर भूमिपूजनाची सिद्धता केली. ‘आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थ श्री महागणपती पूजनं करिष्ये - प्रजारक्षणार्थम, धनरक्षणार्थम, दुर्गासिद्धी करिश्ये’ असा मंत्रघोष झाला आणि सिंधुुदुर्ग किल्ल्याचा पहिला दगड बसला. या ऐतिहासिक सोहळ्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
मोरयाचा धोंडा
मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन करण्यात आले त्या ठिकाणाला ‘मोरयाचा धोंडा’ म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली. या ऐतिहासिक दगडावर गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग यांच्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. याठिकाणी विधिवत गणेश पूजन व सागर पूजन करण्यात आले. समुद्राला नारळ अर्पण करून सिंधुदुर्ग किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
हा ऐतिहासिक सोहळा पार पडल्यानंतर शिवाजी महाराज नौकेतून कुरटे बेटावर गेले. त्यांनी तिथे मुहूर्ताचा पहिला दगड बसविला. यानंतर अधिकृतपणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर बेचाळीस बुरूज, चार किलोमीटरची नागमोडी वळणाची तटबंदी, पंचेचाळीस जिने, पहारेकऱ्यांसाठी चाळीस शौचकुपे, पूर्वेकडे मोठा दरवाजा, पश्चिमेकडे राणीची वेस अशी रचना करण्यात आली आहे. या सर्व बांधकामांकडे नजर टाकल्यास आजही त्यातील भक्कमपणा आणि भव्यता नजरेत भरते. महाराज किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याकडे जातीने लक्ष ठेवून होते. या काळात अनेक अडचणींना महाराजांना सामोरे जावे लागले. मात्र किल्ल्याच्या बांधकामास त्यांनी काहीही कमी पडू दिले नाही.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीनंतर तळकोकणचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलून गेले. या भागाचा नव्याने इतिहास लिहिला जावू लागला.
२५ नोव्हेंबर १६६४ या दिवसापासून सिंधुुदुर्गच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पुढे सिंधुदुर्ग किल्ला ही तळकोकणची ओळख बनली. ज्या दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नवा इतिहास सुरु झाला तो दिवस दुर्दैवाने राज्यकर्त्यांच्या विस्मृतीत गेला आहे. मोजके शिवप्रेमी सोडले तर अनेकांना या दिवसाचे महत्व अजूनही लक्षात आलेले नाही.
मालवण शहराचा विचार करता सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण होण्यापूर्वी हे शहर म्हणजे दलदलीचा प्रदेश होता. सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर मेढा भागात येणाऱ्या समुद्राच्या लाटांचा मारा थांबला. या भागात हळूहळू वस्ती झाली. आज मालवण शहर ज्याप्रमाणे विस्तारलेले दिसते त्या मागे सिंधुुदुर्ग किल्ल्याचा मोठा हिस्सा आहे. मालवणचा भूभागीय विस्तारच नव्हे तर या भागात समृद्धी आणि सुबत्ता येण्यामागेही सिंधुुदुर्ग किल्ल्याच कारणीभूत आहे. याला कुणाचेही दुमत नसेल. सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच मालवणात पर्यटन व्यवसाय वाढीस लागला. सर्वार्थाने सिंधुुदुर्ग किल्ल्याचे असलेले महत्व विचारात घेता समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
साडेतीनशे वर्षानंतरही सिंधुुदुर्ग किल्ल्याचे महत्व वाढतेच आहे. मालवणचे वाढलेले पर्यटन, इथल्या जमिनींचे वाढलेले भाव, रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी या सर्वात किल्ल्याचा मोठेपणा आधुनिक युगातही कायम आहे.
मालवण शहराच्या सौंदर्यात महत्वाची भूमिका बजावणारा सिंधुुदुर्ग किल्ला शहराच्या संरक्षणाची भूमिका बजावत आहे. हा किल्ला शहराच्या संरक्षणाची जबाबदारीही समर्थपणे पेलत आहे.
पावसाळ्यातील उधाण अथवा त्सुनामीसारखी परिस्थिती अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटा स्वत:च्या अंगावर झेलत सिंधुुदुर्ग किल्ला उभा आहे.


पर्यटनात सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व
सिंधुदुर्ग किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूच्या तटबंदीजवळ चुन्यात उमटविलेले महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे अजूनही जपून ठेवण्यात आले आहेत.
किल्ल्यावर शिवछत्रपतींचे मंदिर पहावयास मिळते. दाढीमिशा नसलेली व नावाड्याच्या वेशातील शिवछत्रपतींची मूर्ती एकमेवाद्वितीय आहे. शिवराजेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर सन १६९५ मध्ये राजाराम महाराजांनी स्थापन केले.
चित्रगुप्तांच्या बखरीतही सिंधुुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून उभारणीची स्तुती केली आहे. समुद्रात बांधलेला हा जलदुर्ग शिवाजी महाराजांच्या कुशलतेचा नमुना आहे.


इतिहासाचा ठेवा साकारला
सिंधुदुर्ग किल्ला इतिहासाचा साक्षीदार असलेला दुर्मिळ ठेवा २९ मार्च १६६७ रोजी साकार झाला. तीन वर्षे किल्ल्याचे बांधकाम चालले. त्यासाठी तीन हजार मजूर, दोनशे लोहार, ५० पाथरवट असे हजारो कामगार अहोरात्र मेहनत घेत होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले त्यादिवशी हनुमान जयंती होती. शिवाजी महाराज स्वत: त्यादिवशी सिंधुदुर्गवर हजर राहिले. साखर वाटली, तोफा धडाडल्या, सर्वत्र आनंदीआनंद साजरा केला.
मालवणमध्ये सिंधुुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येत असल्यामुळे येथील नागरिकांना पर्यटन व्यवसायातून शाश्वत रोजगार मिळू लागला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वैभवामुळेच मालवणला पर्यटन नगरीचा दर्जा मिळाला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच मालवणच्या पर्यटनात वाढ झाली. लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी भेट देत असतात.


छत्रपतींकडून सन्मान
सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांपैकी पाथरवटाच्या नाईकांना वस्त्रे व सोन्याच्या कडा, फिरंग्यास सोन्याची कडी, गोविंद प्रभूंना मोत्याचा तुरा, वास्तुशास्त्राच्या विद्वानांना पाच हजार रुपये तर मुख्यस्थापकांना रायगड किल्ला उभारणीची कामगिरी देण्यात आली होती.

मालवण येथील मोरयाचा धोंडा

एक कोटी होणार खर्च
वास्तुविशारद - हिरोजी इंदुलकर ४बेटाचे नाव - कुरटे
बंदिस्त जागेचे क्षेत्रफळ - २० हेक्टर ४तीन वर्षे चालले बांधकाम
३ मीटरचे ४२ बुरूज ४३५०० मजूर राबले
तटबंदीला ४५ जिने

पर्यटकांची संख्या


आर्थिक वर्षानुसार गेल्या काही वर्षातील बंदर विभागाकडून प्राप्त आकडेवारी (१ एप्रिल ते ३१ मार्च)

२००५-०६ ७६ हजार ७८७
२००६-०७ १ लाख १८ हजार ३९
२००८-०९ २ लाख १२ हजार ४०३
२००९-१० २ लाख ३४ हजार २१९
२०१०-११ २ लाख ५१ हजार ८४२
२०११-१२ २ लाख ६७ हजार १९९
२०१२-१३ २ लाख ६९ हजार ६३१
२०१३-१४ २ लाख ४९ हजार ६२२

Web Title: The solitary conflicts of history witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.